खवय्ये नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाच्या शोधात असतात. अशा खवय्यांना वसईत विविध मांसाहारी आणि शाकाहारी न चाखलेल्या पदार्थाची लज्जत अनुभवता येणार आहे.  ‘चिकन दिलसुख’, ‘चिकन टॅगी सॉस’, ‘मोरोक्कन कबाब’, ‘झिलमिल कबाब’ अशी यांपैकी काही पदार्थाची नावे आहेत. वसईच्या पर्यटनात खाद्यसंस्कृती महत्त्वाची आहे. ते ओळखून हे पदार्थ बनविण्यात आले आहेत. या वेगळ्या नावांनीच जिभेला पाणी सुटते.

वसईत निसर्ग, ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने येत असतात. वसईच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीमुळे खास लज्जतदार पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये पर्यटकही येत असतात. त्यामुळे वसईच्या पारनाका परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. खवय्या पर्यटकांना आकर्षित करणारे यातलेच एक हॉटेल म्हणजे हॉटेल वैभव गॅलक्सी. चिकन आणि मटणाचे आजवर न चाखलेले विविधांगी पदार्थ या हॉटेलचे वैशिष्टय़ आहे.

वसईच्या पारनाका या मध्यवर्ती ठिकाणावरच वैभव गॅलक्सी हे हॉटेल आहे. बारबंदीच्या काळात ते बंद पडले आणि मग मयूर गाढे या मराठी तरुणाने ते नव्याने चालवायला घेतले. वसईकर हे खवय्ये आहेत हे जाणून त्यांच्या चवीसाठी मयूरने नवीन काय देता येईल याचा विचार करीत विविध पदार्थाचा मेनू आखला. चायनीजचे असे अनेक पदार्थ आहेत जे सहसा मिळत नाहीत. त्याचा त्यांनी शोध घेतला. या पदार्थासह आगरी, मालवणी, मोगलाई आदी विविध प्रांतांतील आजवर खवय्यांनी न चाखलेले पदार्थ त्यांनी उपलब्ध केले. कबाबचे विविध प्रकार येथे आहेत. त्यात ‘मोरोक्कन कबाब’, ‘झिलमिल कबाब’ आदींचा समावेश आहे. याशिवाय चिकन दिलखुश, चिकन रोझाली कबाब आदी पदार्थ आहेत. ‘चिकन रोझेली कबाब’ हा पदार्थ मटण आणि चिकनच्या खिम्याच्या एकत्रित मिश्रणाने बनवला जातो. ‘चॉपर राइस’ हा चिकन खिम्यापासून बनवलेला खास पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे. लाल आणि पिवळ्या सॉसमध्ये बनवलेल्या ‘चिकन टॅगी सॉस’ या पदार्थाला खास मागणी आहे. ‘चिकन दिलसुख’मध्ये लाल मसाल्यातले झणझणीत चिकन मिळते.

सगळेच खवय्ये मांसाहारी नसतात याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे जेवढे वैविध्य मांसाहारी पदार्थात आहे तेवढेच वैविध्य शाकाहारी पदार्थामध्येदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यात ‘व्हेज चाकीरोडी’ हा पदार्थ खास आहे. पनीर, मशरूम आणि कॉर्न यांच्या एकत्रित मिश्रणाने हा पदार्थ तयार करण्यात येतो. पनीरमध्ये ‘पनीर अजवाईनी’, ‘पनीर टिल्ला लसुणी’, ‘पनीर पहाडी टिल्ला’ आदी विविध प्रकार आहेत.

हे सर्व पदार्थ ग्राहकांना देताना त्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे. यासाठी ते ताजे बनविण्यावर भर दिला जातो. मच्छी ही आगरी आणि मालवणी प्रकारात बनवली जाते. मासे हे शीतपेटीत गोठवलेले नसतात. ग्राहकांना एक वेळ ताजे मासे नाही मिळाले तरी चालतील पण त्यांना बर्फात गोठवलेले मासे मिळता कामा नये असे त्यांनी सांगितले. टॅरेस गार्डनमध्ये निवांत गप्पा मारत लज्जतदार व्यजनांचा आस्वाद घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हॉटेल गॅलक्सी वैभव

  • कुठे – पारनाका, वसई (प.)
  • कधी – सकाळी ११ ते ३ रात्री ६ ते १२