वसई : करोनाच्या वाढच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने टाळेबंदी लागू केल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. आम्ही नियमांचे पालन करू, पण टाळेबंदी उठवा, या मागणीसाठी वसईतील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी गुरुवारी आंदोलन केले.

टाळेबंदीच्या नव्या नियमांमध्ये सर्व हॉटेल, उपाहारगृह, मद्यालये (बिअर बार) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यांना केवळ पार्सल जेवण आणि मद्य देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यातही वेळ ही सकाळी ७ ते रात्री ८ अशीच आहे. यामुळे जेमतेम १० टक्के व्यवसाय होत आहे. शासनाच्या टाळेबंदीचा हा निर्णय हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक संकटात टाकणारा आहे, असे हॉटेल संघटनांनी सांगितले. टाळेबंदी उठवा या मागणीसाठी गुरुवारी वसई विरार शहरातील सर्व हॉटेलचालकांनी मूक आंदोलन केले. हॉटेलच्या बाहेर फलक घेऊन हॉटेलचे कर्मचारी उभे होते. आयपीएल, चित्रीकरणाला परवानगी मिळते, मग आम्हाला का नाही, असा सवाल त्यांनी केला. या आंदोलनाबाबत माहिती देताना हॉटेल व्यावसायिक हरीश शेट्टी यांनी सांगितले की, पार्सलची सुविधा असली तरी व्यवसाय जेमतेम १० टक्के होते. हॉटेलवरील कर्जाचे हप्ते, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च तसाच आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा. आम्ही पन्नास टक्के ग्राहक घेऊन सर्व नियमांचे पालन करू, पण हॉटेल सुरू ठेवायला परवानगी द्या, असे त्यांनी सांगितले. मागील वर्षी करोनाच्या काळात साडेसात महिने हॉटेल बंद होते. त्यामुळे आधीच हा व्यवसाय डबघाईला आला आहे.  टाळेबंदी लागू केल्याने भीषण परिस्थिती उद्भवली आहे. हॉटेलचे कर्मचारीच नव्हे, तर चिकन, मटण विक्रेते, किरणा,  शेतकरी आदी अवलंबून असतात. त्या सर्वांवर परिणाम होणार असल्याचे हॉटेल व्यावसायिक सुजित शेट्टी यांनी सांगितले.