नवी मुंबईतील हॉटस्पॉट वगळता हॉटेल्स, रेस्तराँ आणि बार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन संचलनालय यांचा उपरोक्त आदेश क्रमांक ५ व आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या पत्र संदर्भ क्रमांक ६ अन्वये रेस्तराँ, बार आणि हॉटेल्स हे सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर केल्या प्रमाणे निर्बंध लागू असतील. तसेच हॉटेल्स आणि बार या ठिकाणी करोना संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे बंधनकारक असेल. एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश देता येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोन येथील लॉकडाउन हा ३१ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत असणार आहे असंही नवी मुंबईच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार स्पष्ट करण्यात आलं आहे. हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोन वगळून ३० सप्टेंबरच्या मिशन बिगिन अगेन सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ५ ऑक्टोबरपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्तराँ आणि बार यांना क्षमतेपेक्षा ५० टक्के मर्यादेत व्यवसाय करण्यास संमती देण्यात आली होती. ही वेळ आता वाढवण्यात आली असून आता सकाळी ८ ते रात्री १० अशी वेळ करण्यात आली आहे. उद्या म्हणजेच शनिवारपासून या आदेशाची अमलबजावणी केली जाणार आहे.