12 August 2020

News Flash

कल्याणमध्ये विकासकाकडून सदनिका ग्राहकांची फसवणूक

प्रत्यक्ष करारावर डिसेंबर २०१७ ही मुदत देण्यात आली होती.

संग्रहित छायाचित्र

पाच वर्षे उलटल्यानंतरही घराचा ताबा नाही; गृहप्रकल्पही अपूर्ण; पोलिसांत तक्रार दाखल होताच विकासक बेपत्ता

२०१५ मध्ये घरांचा ताबा देण्याचे आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत सदनिकांचा ताबा न देणाऱ्या विकासक आणि त्यांच्या साथीदारांवर कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदनिकांचा ताबा देणे दूरच, पण हा गृहप्रकल्पही पूर्ण झाला नसल्याने सदनिका ग्राहकांनी पोलिसांत तक्रार केली. मात्र, त्यापूर्वीच विकासक आणि त्याचे साथीदार बेपत्ता झाले आहेत.

पटेल ग्रुपचे विकासक हसमुख पटेल, त्यांचे भागीदार जिग्नेश मणियार, ऋतु वासनिक, राजगोपालन रंगनाथ यांच्या विरुद्ध फसवणूक, विश्वासघात, मालमत्तेचे विहित वेळेत हस्तांतरण करण्यात दिरंगाई केल्याची तक्रार दाखल केली आहे. कल्याणमधील खडकपाडा येथील रहिवासी आशीष झुंझारराव यांच्यासह इतर ११ जणांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील चिकणघरमधील  म्हाडा वसाहतीजवळ ‘पटेल कोलसेस’ नावाने पटेल विकासकाचे नवीन गृहसंकुल उभारणीचे काम सुरू आहे. खडकपाडा भागात राहणारे आशीष झुंझारराव यांनी पटेल कोलसिस या नवीन गृहसंकुलात ५३ लाख ८५ हजार रुपये किमतीची एक सदनिका नोंदणीकृत केली होती. या सदनिकेसाठी त्यांनी एका वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज घेतले होते. सर्व रक्कम त्यांनी विकासकाकडे भरणा केली होती. मात्र, विकासकाकडून निर्धारित मुदतीत सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने झुंजारराव यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात विकासका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे डोंबिवलीतील निखील भामरे यांनी गृह कर्ज घेऊन या प्रकल्पात २०१४ मध्ये सदनिका खरेदी केली होती. या प्रकल्पातील २०० हून अधिक असलेले गुंतवणूकदार लवकरच एकत्र येऊन एक व्यासपीठ तयार करून विकासका विरुद्ध कायदेशीर लढा देणार आहेत.

‘या गृहप्रकल्पात २०० ग्राहकांनी सदनिकांची नोंद केली आहे. २०१५पर्यंत घरांचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्ष करारावर डिसेंबर २०१७ ही मुदत देण्यात आली होती. तसेच निर्धारित वेळेत ताबा न देऊ शकल्यास ग्राहकांना नऊ टक्के दराने व्याज देण्याची तयारीही विकासकाने दर्शवली होती,’ अशी माहिती या प्रकल्पातील गुंतवणूकदार सजन जॉन यांनी दिली. विकासकाकडून फसवणूक होत असल्याची चाहूल लागल्याने गुंतवणूकदारांनी महारेराकडे तक्रार केली. त्यांच्याकडून याप्रकरणी विकासकावर कारवाई होऊ शकते, पण ठोस कोणतेही आश्वासन दिले गेले नाही, असे जॉन यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

म्हाडाचे रहिवाशीही हवालदील

या प्रकल्पात बँकेकडून कर्ज घेऊन सदनिका खरेदी करणाऱ्यांची सुमारे पाच कोटी ५० लाख आणि इतर गुंतवणूकदारांची सुमारे ३५ कोटीची रक्कम सध्या या प्रकल्पात अडकून पडली आहे, असे गुंतवणूकदारांनी सांगितले. याच प्रकल्पाजवळील म्हाडा वसाहतीचा याच विकासकाने पुनर्विकास सुरू केला आहे. या वसाहतीत अल्प उत्पन्न गटातील ४४८ रहिवासी राहतात. नवीन घर मिळेल या विचारातून पुनर्विकासासाठी आपली घरे विकासकाच्या स्वाधीन केली. मात्र, त्यांना हक्काचे घर नाहीच, पण भाडेही देण्यात आले नाही, असे सजन जॉन यांनी सांगितले.

विकासकाचा फोन बंद

पटेल ग्रुप कंपनीचे विकासक हसमुख पटेल यांच्या भ्रमणध्वनीवर सतत संपर्क केला. ते कॉल्स अन्य भ्रमणध्वनी फिरवले जात असल्याचे ध्वनिमुद्रण मोबाइल कंपनीकडून ऐकविली जाते. पटेल यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवून गृहप्रकल्प, गुंतवणूकदारांची फसवणूक याविषयी जाणून देण्यासाठी लघुसंदेश पाठविला. त्यालाही हसमुख पटेल यांनी प्रतिसाद दिला नाही.

सदनिका खरेदीदारांच्या तक्रारीवरून विकासकाचा शोध सुरू केला आहे. त्यांच्या उल्हासनगरमधील घर, कार्यालयावर पाळत ठेवण्यात आली आहे. विकासक आणि त्यांचे भागीदार यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. – प्रकाश लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महात्मा फुले पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:20 am

Web Title: house welfare fraud by developer akp 94
Next Stories
1 दहा महिन्यांत ८०३ बालकांचे अपहरण
2 उपनगरी गाडय़ांत जागा अडवणाऱ्या प्रवाशांना तडाखा
3 खड्डय़ांचे ग्रहण कायम
Just Now!
X