वसईत चोरांच्या टोळीची नवीन कार्यपद्धत
वसईत सध्या घरफोडय़ा करणाऱ्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या घरफोडय़ा रात्री होत नसून भरदिवसा होत आहेत. दिवसा इमारतीत शिरून काही मिनिटात बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात येत आहे. दिवसा चोरी करण्याची नवीन कार्यपद्धत चोरांनी शोधून काढली आहे.
उन्हाळ्यात शाळांना सुटी लागल्याने लोक गावी जाऊ लागले आहेत. त्यामुळे चोरांनी बंद घरांना लक्ष्य केले आहे. वसई-विरार परिसरात अनेक घरफोडय़ा होत आहेत. नायगाव परिसरात गेल्या आठवडय़ात सतरा घरफोडय़ा झाल्या. रश्मी स्टार सिटी परिसरात पाच घरफोडय़ा झाल्यात. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दिवसा घरफोडय़ा करण्याची नवी पद्धत चोरांनी शोधून काढली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असते, कुठलीही संशयास्पद हालचाल लक्ष वेधून घेते. त्यामुळे अडचण होते. दिवसा कुठेही जाता येते. विविध राज्यांतून आलेल्या टोळ्या वसईत सक्रिय झाल्या आहेत.
चोरी करण्याची पद्धत
वसईत अनेक नवीन इमारती झाल्या आहेत. या इमारतींना सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षा रक्षक नसतात. अशा इमारतींची रेकी केली जाते. दिवसा सर्वसामान्य कपडय़ातील चोर इमारतीत शिरतात. त्यांचे कपडे चांगले असतात. सोबत महिलाही असतात. त्यामुळे कुणी हटकत नाही. जर कुणी हटक लेच तर पत्ता शोधण्यासारखा काही तरी बहाणा करून वेळ मारून नेली जाते. त्यांचा साथीदार इमारतीच्या खाली थांबतो. अवघ्या काही सेंकदात कुलूप तोडले जाते आणि घरातील मौल्यवान ऐवज लंपास केला जातो. दुपारच्या वेळी एखादी महिला बाजारात किंवा बाहेर गेली की तिच्यावर पाळत ठेवली जाते. ती घरी परतण्याच्या आत तिच्या घरात चोरी केली जाते. अनेक ठिकाणच्या इमारतींचे सुरक्षा रक्षक चोरांसाठी खबऱ्या म्हणून काम करतात. कुठले घर बंद आहे, कुणाच्या घरात जास्त ऐवज सापडू शकेल त्याची माहिती दिली जाते. माणिकपूर पोलिसांनी अशा प्रकरणात काही सुरक्षा रक्षकांना नुकतीच अटकही केली होती.

दिवसा होत असलेल्या चोरीच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरात मौल्यवान ऐवज, दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे, इमारतीत सीसीटीव्ही बसविणे, सुरक्षा रक्षकांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे, इमारतीत बाहेरून आलेल्या माणसांची ओळख पटवून आत सोडणे, रजिस्टरमध्ये त्यांच्या नोंदी ठेवणे आदी सूचना केल्या आहेत. आम्ही दिवसा गस्ती वाढविल्या असून नागरिकांनीही सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे पालन केले तर या घरफोडय़ांना आळा बसू शकेल.
– रणजित पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे</strong>