सहकार खात्याचा निर्णय
जिल्ह्य़ातील गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांकडून थकबाकी वसूल करण्याचे अधिकार सहकार विभागाने ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनला दिले आहेत. त्याचप्रमाणे भाडेकरार नोंदवून घेण्याचे कामही फेडरेशनकडे सोपविले आहे. फेडरेशनचे ठाणे येथील मुख्य कार्यालय आणि डोंबिवली तसेच भाईंदर येथील शाखांमध्ये त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. थकबाकी वसूल करण्याचे अधिकार राज्य भू-विकास बँकेकडे होते. ती बंद झाल्यानंतर ते काम ठप्प झाले होते. सहकार विभागाच्या निर्णयामुळे ते पूर्ववत सुरू झाले आहे.
गृहनिर्माण संस्थांची मासिक देयके भरणे सभासदांना अनिवार्य असते, कारण त्यावरच या संस्थांचा कारभार चालत असतो. मात्र अनेक सभासद वर्गणी भरण्यास चालढकलपणा करतात. आता सोसायटीची वर्गणी न भरणाऱ्या सभासदांवर कारवाई करण्याचे अधिकार आता हौसिंग फेडरेशनला देण्यात आले आहेत. प्रसंगी थकबाकीदाराची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही वसुली अधिकाऱ्याला आहेत.
सदनिका भाडय़ाने देण्यासाठी सोसायटीच्या सभासदांना करार करावा लागतो. त्या करारासाठी वकील अथवा एजंट अवाच्या सवा शुल्क आकारणी करतात. त्यामुळे सदनिकाधारकांना दिलासा देण्यासाठी भाडेकरारांची नोंदणी करण्याची तयारीही फेडरेशनने दर्शवली होती.
महसूल विभागाने ती मान्य केली आहे. तेव्हा यासंदर्भात सोसायटी सभासदांनी फेडरेशनच्या कार्यालयांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले आहे.