|| ऋषिकेश मुळे

ठाण्यात महिनाभरात सर्पमित्रांना ३० वेळा पाचारण :- ठाणे तसेच घोडबंदर भागातील गृहसंकुले आणि कारखान्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून घोणस जातीचे साप सातत्याने आढळून येत असून गेल्या महिनाभरात अशा सापांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी सर्पमित्रांना ३०  वेळा पाचारण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच वन्यजीव प्रेमी संस्थांनाही अशाच प्रकारचे कॉल येत आहेत. सातत्याने गृहसंकुलांमध्ये घोणस जातीचे साप आढळून येत आहेत. विणीचा काळ असल्याने हे साप गृहसंकुलांतील उद्याने, अडगळीच्या जागांमध्ये आढळत आहेत.

ठाणे शहराच्या एका बाजूला विस्तीर्ण खाडीकिनारा आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर परिसर येतो. खाडी आणि उद्यानाच्या मधोमध ठाणे शहर वसलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वागळे इस्टेट, पोखरण आणि घोडबंदर भागात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. तर वागळे आणि पोखरण या परिसरात लघुउद्योजकांचे कारखाने आहेत. या गृहसंकुलातील रहिवासी आणि कारखान्यांतील कामगार मर्कटलीलांमुळे हैराण झाले असतानाच त्यापाठोपाठ आता या भागात घोणस जातीचे विषारी साप सातत्याने आढळत आहेत.

पहाटेच्या वेळेत घोणस जातीचे साप बाहेर पडतात. त्यामुळे शहरी परिसरात या सापांचा वावर वाढला आहे. वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, इंदिरानगर, वर्तकनगर, उपवन आणि घोडबंदर परिसर या भागातील गृहसंकुलांसह कारखान्यांमध्ये चार फुटांपेक्षा अधिक लांबीचे घोणस साप आढळून आल्याचे असे वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी सांगितले.

संघर्षांमुळे आसरा

वीणीच्या हंगामात काळात मादी शरीरातून विशिष्ट द्रव बाहेर सोडते. या द्रवाच्या गंधाकडे नर आकर्षित होतो. या गंधाद्वारे मादीपर्यंत पोहोचणाऱ्या नरांची संख्या जास्त असते. या नर घोणसांमध्ये अनेकदा संघर्ष झडतो. त्यातून ते वाट चुकून गृहसंकुलांतील अडगळीच्या जागा, कारखाने, गोदामे यांचा आसरा घेतात.