ठाणे जिल्ह्याचा मुंबई महानगर क्षेत्रात समावेश झाल्यापासून जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस आले असून पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अनेक जण ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये घरे खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहेत.

मार्च महिन्यापासून आलेल्या करोना संकटामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीच्या काळात जिल्ह्याच्या सर्वच शहरांमधील गृहसंकुलांची बांधकामे ठप्प झाली होती. त्यामुळे घरांच्या खरेदी-विक्रीचा वेगही मंदावला होता. परंतु राज्य शासनाने टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल केल्यामुळे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आणि आसनगाव या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या अनेक गृहसंकुलांच्या कामाला पुन्हा वेगाने सुरुवात झाली आहे. या कामाच्या दरम्यान कामगारांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बांधकाम व्यावसायिक  सोवळ्याचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत, तर गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प असलेल्या घरांच्या विक्रीला सुरुवात करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना गृहखरेदीवर विशेष सूट आणि आकर्षक भेटवस्तूही देत आहेत. तसेच टाळेबंदीमुळे घरांच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होत आहे.

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकास प्रकल्प प्राधिकरणाच्या सोबतीने ठाणे जिल्ह्यात वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी विविध विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. या विकास प्रकल्पांमध्ये काही रस्ते, उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आणि आसनगाव या शहरांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात ही शहरे वाहतूक व्यवस्थेत अद्ययावत होणार असून, मुंबई शहराला अतिशय जलद गतीने जोडली जाणार आहेत. त्यामुळे या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात उभ्या राहणाऱ्या या गृहसंकुलांमध्ये मोठय़ा आकाराची घरे कमी किमतीत मिळत असल्याने ठाणे जिल्ह्यात घर खरेदी करण्याला ग्राहक मोठय़ा प्रमाणात पसंती देतात. मात्र, मार्च महिन्यापासून आलेल्या करोनाच्या संकटामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच गृहप्रकल्पांची बांधकामे ठप्प झाली होती. कामे बंद पडल्याने घरांची विक्रीही थांबली होती. त्यामुळे बँकांचे गृहकर्जावरील व्याजदर कमी असतानाही करोनाच्या काळाचा जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक चिंतेत होते. मात्र, राज्य सरकारने टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात निर्बंध शिथिल केल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरातील गृहसंकुलांच्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे.

गृहसंकुलांच्या बांधकामाच्या वेळी कामगारांमध्ये करोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी बांधकाम व्यावसायिक विशेष काळजी घेत आहेत. बांधकाम व्यावसायिकांतर्फे कामगारांना मोफत मुखपट्टय़ा दिल्या जात असून कामाच्या वेळी मुखपट्टय़ा वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर बांधकामाच्या ठिकाणी काही विशेष अंतर राखून सॅनिटायझर ठेवण्यात आले असून काम सुरू करताना तसेच काम संपल्यावर सॅनिटायझरचा वापर करणे कामगारांना बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय बांधकामाच्या ठिकाणी दोन कामगारांमध्ये सुरक्षित अंतर राहील याचीही विशेष दक्षता घेतली जात असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या शरीराच्या तापमानाची तपासणी केली जात असून अनेक बांधकाम व्यावसायिक कामगारांच्या आरोग्य तपासणीवरही भर देत आहेत. व्यावसायिकांतर्फे हे सर्व नियम पाळले जात असल्याने गृहसंकुलांच्या बांधकामानेही वेग पकडला असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

ग्राहकांसाठी आकर्षक सवलती

गेल्या काही महिन्यांपासून विविध बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे अनेक जाणकारांकडून २०२० हे वर्ष गृहखरेदी करण्यासाठी उत्तम असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे नोटाबंदी आणि वस्तू सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर मंदावलेल्या बांधकाम व्यवसायाने जानेवारी महिन्यापासून काहीशी उचल घेतली होती. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीस आलेल्या करोना संसर्गाच्या संकटामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत हे क्षेत्र गेल्या तीन महिन्यांपासून पूर्ण ठप्प झाले होते. राज्य सरकारने टाळेबंदीचे काही नियम शिथिल केल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी आता नव्या योजना आखल्या आहेत. त्यानुसार घर खरेदीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक टीव्ही, फ्रीज आणि दुचाकी यांसारख्या भेटवस्तू देत आहेत, तर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आणि आसनगाव या शहरांतील अनेक बांधकाम व्यावसायिक आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून नव्या घरांच्या खरेदीवर ग्राहकांना नोंदणी शुल्कातून सूट देत आहेत. याचबरोबर नव्या घरांमध्ये बांधकाम व्यावसायिक इंटरनेट सुविधांसह जियो गीगाफायबर, गूगल असिस्टंट आणि अ‍ॅमेझॉन ऑलेक्सा यांसारख्या विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यावर भर देत आहेत. तसेच टाळेबंदीच्या सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद असल्याने ग्राहकांना गृहसंकुलांपर्यंत घेऊन येण्यासाठी व्यावसायिक विशेष गाडय़ांची व्यवस्था करत आहेत. त्यामुळे जून महिन्यापासून गृहसंकुलांमध्ये घरे पाहण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली. टाळेबंदीमुळे विस्कटलेली बांधकाम व्यवसायाची घडी बसवण्यासाठी आता अनेक बांधकाम व्यावसायिकांनी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा परिसरातील घरांच्या किमतीमध्ये दोन ते तीन लाखांपर्यंत कपात केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली शहरात १ बीएचके घरांच्या किमती ३५ लाखांपासून सुरू होत आहेत, तर या दरांसोबतच अनेक व्यावसायिक १ बीएचके घरांमध्ये फर्निचरही उपलब्ध करून देत आहेत. तर टाळेबंदीच्या पूर्वी २५ लाखांच्या पुढे विकल्या जाणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा येथील घरांच्या किमती २१ ते २२ लाखांपर्यंत खाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या काळात घरे खरेदी केल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

ठाणे हे विविध घडामोडींचे शहर आहे. स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी, वॉटरफ्रंट प्रकल्पामुळे राहणीमानावर मोठा परिणाम होणार आहे. अन्य शहरांच्या तुलनेमध्ये येथील घरांचे दर अनेक अर्थाने आकर्षक असतील. मध्यम उत्पन्न (एमआयजी) आणि उच्च उत्पन्न (एचआयजी) गटांतील कुटुंबांसाठी हे अतिशय अनुकूल ठिकाण आहे. तर निम्न उत्पन्न गटासाठी (एलआयजी) दिवा हे अतिशय सुयोग्य आहे.

– मुश्ताक शेख, समरिन ग्रुप

ठाणे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक ठिकाण आहे. येथे निसर्ग आणि शहरीकरण यांचा समतोल दिसतो. येथे असणारे तलाव, शॉपिंग मॉल, शाळा, संस्कृती, आहार, दळणवळण या सुविधा उत्तम आहेत.

– समीर सचदे, समरिन ग्रुप