खाजगी दवाखाने आणि रुग्णालयांतील डॉक्टरांचा प्रश्न

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील बहुतांश खाजगी दवाखाने आणि रूग्णालये बुधवारी बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत होती. शासनाच्या आदेशानंतर गुरूवारी यातील बहुतांश डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू केले असले तरी सुरक्षा साधनांशिवाय सेवा कशी द्यायची, असा प्रश्न आता डॉक्टर उपस्थित करत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी उपाययोजना करत असताना डॉक्टरांसाठी लागणारे सुरक्षा साहित्य बाजारातून हद्दपार झाले असून त्याशिवाय रूग्ण तपासणे धोक्याचे होऊ  शकते, असेही अनेक डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा साहित्याची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही दिवसांत कडक निर्बंध लादले आहेत. १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र, बुधवारी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील बहुंताश रूग्णालयांच्या बाह्यरूग्ण विभाग आणि अनेक खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांचे हाल झाले. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर राज्य शासनाने दवाखाने आणि रूग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर गुरूवारी दोन्ही शहरांतील जवळपास सर्वच दवाखाने सुरू करण्यात आले. मोठय़ा रूग्णालयांतील बाह्यरूग्ण विभागही सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. असे असले तरी डॉक्टरांनी रूग्ण सेवा देत असताना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत तक्रार करण्यास सुरूवात केली आहे. करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्यास सांगण्यात येते आहे. मात्र स्वत:च्या आणि रूग्णांच्या सुरक्षेसाठी एन ९५ मास्क, अंगातील संरक्षण कपडे आणि हातमोजे बाजारात उपलब्ध नसल्याचे इंडियन मेडीकल असोसिएशनच्या बदलापुरचे सचिव कृष्णा निमसाखरे यांनी सांगितले आहे. रूग्णांना सेवा देत असताना सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी बाजारात साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णांना तपासत असताना करोना संसर्गाची भीतीही वाढते, त्यामुळे आम्हाला असे साहित्य उपलब्ध करून दिल्यास आम्हीही जोमाने कामाला लागू असे निमसाखरे यांनी सांगितले आहे. तर बाह्यरूग्ण विभाग सुरू ठेवायचा की नाही याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या, त्यामुळे गोंधळातून आम्ही दवाखाने बंद ठेवले असेही काही डॉक्टरांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे. तसेच साधनांची कमतरता आहे ही बाब खरी असल्याचे अंबरनाथचे अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. मनोज कंदोई यांनी सांगितले आहे. बहुतांश दवाखाने सुरू असून काही वैयक्तित कारणामुळेच काही दवाखाने बंद असल्याचेही कंदोई यांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आम्ही अशी साधने उपलब्ध केली आहेत. तरी असा काही तुटवडा असेल तर त्याची माहिती घेऊन तसा पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलली जातील.

– जयराज देशमुख, तहसीलदार, अंबरनाथ तालुका.