ठाण्यापलीकडील स्थानकांत पादचारी पुलांवर दुप्पट भार

आशीष धनगर, किशोर कोकणे

ठाणे : एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटनेला दीड वर्ष उलटत असतानाही रेल्वे पादचारी पुलांवरील गर्दीच्या नियंत्रणाचा प्रश्न सोडवणे रेल्वे प्रशासनाला जमलेले नाही. ठाण्यापुढील दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांमध्ये रेल्वेच्या पादचारी पुलांवरच सुरू असलेल्या तिकीट घरांमुळे सकाळ-संध्याकाळी या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळते. त्याामुळे पुलांवर चेंगराचेंगरी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात दीड वर्षांपूर्वी झालेल्या चेंगचेंगरीत २३ जणांना प्राण गमवावे लागले होते. अरुंद तसेच जुन्या झालेल्या पादचारी पुलामुळे ही घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे स्थानकातील जुन्या आणि अरुंद पादचारी पुलाचा प्रश्न चर्चेत आला होता.

या घटनेपासून बोध घेत रेल्वे प्रशासनाने सर्वच स्थानकांवरील पादचारी पुलांचे सर्वेक्षण हाती घेतले, तसेच काही उपाययोजनाही केल्या. असे असले तरी ठाणेपलीकडे असलेल्या दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांमधील तिकीट

विक्री व्यवस्थेच्या चुकीच्या नियोजनामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दिवा रेल्वे स्थानकातील ८० टक्के नागरिक हे पूर्वेला राहतात. या रेल्वे स्थानकात तिकीट घर हे पश्चिमेला आहे. त्यामुळे प्रवाशांना जिने चढून पुन्हा खाली उतरून तिकीट खरेदी करावी लागते. त्यानंतर पुन्हा जिने चढून फलाटावर येण्यासाठी खाली उतरावे लागत आहे.

प्रवाशांचा हा द्राविडी प्राणायाम टाळला जावा यासाठी रेल्वे प्रशासनाने येथील पुलावर एटीव्हीएम मशीन बसविल्या आहेत. तिकीट खरेदी करणारे प्रवासी हे पुलावरूनच तिकीट खरेदी करतात. याचा परिणाम या पादचारी पुलावर लांबच-लांब रांगा असतात.

कोपर रेल्वे स्थानकातही पुलावर एकच तिकीट घर आहे.  या तिकीट घराला जोडलेला पादचारी पूल अत्यंत जुना झाला आहे. या पुलाची रुंदी तीन मीटरपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या पुलावरही चेंगराचेंगरीचे प्रकार घडण्याची भीती सातत्याने व्यक्त होत आहे.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात होम फलाट तयार करण्यात आला. हा फलाट पश्चिमेला असून तिथे नवे तिकीट घरही बांधले आहे. पुलावरून चढ-उतार करण्यापेक्षा अनेक प्रवासी पुलावर असलेल्या तिकीट घरावरच अवलंबून आहेत. त्यात हा पूल धोकादायक झाला असून त्याचे सिमेंट निखळत असल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. तरीही या पुलावरून ये-जा सुरू असते.