यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती; जुन्या कुशल कामगारांची कमतरता

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शासनाने अनेक अत्यावश्यक सेवेतील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कंपन्या सुरू केल्यानंतर तेथील यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागली आहेत. त्यात जुने कुशल कामगार गावी निघून गेले आहेत. त्यामुळे उद्योजकांसमोर अडचणींचे डोंगर उभा राहिला आहे.

उत्पादन केले तरी मालाला उठाव नसल्याने ते विकायचे कुठे, तसेच मुंबईतील काळबादेवीसारख्या घाऊक बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. उद्योग सुरू करून करायचे काय, असा प्रश्न डोंबिवली, अंबरनाथ, सरवली-भिवंडी औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांना पडला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील औषध वगळता सिमेंट, लोखंड, इलेक्ट्रॉनिक्स, कापड प्रक्रिया, अभियांत्रिकी उद्योग शासनाने सरसकट सुरू करण्यास परवानगी दिली नाही. या उद्योगांमधील अत्यावश्यक सेवेसाठी काय लागते, ती गरज ओळखून इतर उद्योगांना परवानगी दिली आहे. तुरळक कंपन्या शासन मान्यतेने सुरू आहेत, असे ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’चे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्यांमध्ये कामगारांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन काही ठरावीक कंपन्यांना जिल्हा प्रशासन, एमआयडीसीने परवानगी दिली आहे. अडीच महिन्यांनी कंपन्या सुरू केल्याने कंपन्यांमधील यंत्रसामग्रीवर धुळीचे थर साचले आहेत. बॉयलर, कॅपिसीटर आणि इतर यंत्रसामग्रींची देखभाल-दुरुस्ती, चाचणी करून मगच ती सुरू करावी लागणार आहेत. या कामांसाठी किमान १५ ते २० दिवस लागणार आहेत. ही कामे करणारे बहुतांशी तंत्रज्ञ मुंबई भागातील आहे. स्थानिक पातळीवर असे तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत, असे उद्योजकांनी सांगितले.  डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी भागातील कंपन्यांमध्ये कसारा, कर्जत, वांगणी, वाडा, मुरबाड, शहापूर, मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबई भागातून कामगार येतात. या कामगारांना काही कंपनी चालकांनी एक हजार रुपयांचा पेट्रोल खर्च देऊ केला आहे, असे एका उद्योजकाने सांगितले.

कंपनी मालक चिंताग्रस्त

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील २५ रासायनिक कंपन्यांना तीन महिन्यांपूर्वी प्रदूषण केल्याप्रकरणी बंदच्या नोटिसा औद्योगिक सुरक्षितता आणि आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत. आधी नोटिसा आणि त्यानंतर टाळेबंदीमुळे झालेले आर्थिक नुकसान विचारात घेऊन या कंपनी चालकांनी कंपन्या सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, वरून आदेश असल्यामुळे कंपन्या तुम्हाला सुरू करता येणार नाहीत, अशी कारणे स्थानिक अधिकारी देत आहेत. तर ‘असे काही आदेश नाहीत’ असे ठाणे कामगार कार्यालयातून सांगण्यात येते. या रस्सीखेचमध्ये उद्योजक अडकले आहेत.

सुरक्षिततेच्या कारणावरून संबंधित कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. नोटिशीप्रमाणे संबंधित कंपनी चालकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे अहवाल आपल्या विभागाकडे दाखल करायचे आहेत. या कंपन्यांचे अहवाल दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणीनंतर परवानगीचा विचार केला जाईल. अद्याप असे अहवाल या कंपन्यांकडून प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

– विनायक लोंढे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालय