कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीचे निमित्त ठरणारी महालक्ष्मी हॉटेलजवळील कचराकुंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील विविध भागातून येणाऱ्या रिक्षा, बाहेरगावाहून येणाऱ्या बस, खासगी वाहने या सगळ्यांच्या गोतावळ्यात असलेल्या या कचराकुंडीमुळे शहराच्या अस्वच्छतेत मोठी भर पडत आहे.  
कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या महालक्ष्मी हॉटेलजवळ ही कचराकुंडी आहे. गुरूदेव हॉटेल ते कल्याण रेल्वे स्थानक या शहराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध या कचराकुंडीने मोठी जागा व्यापली आहे. कचराकुंडीजवळच स्कायवॉकवर चढण्यासाठीची व्यवस्था आहे. याच स्कायवॉकचा वापर करून अनेक प्रवासी कल्याण रेल्वे स्थानक किंवा शहराचा अन्य भाग गाठत असतात. त्याचप्रमाणे याच भागात भाजी मंडईही आहे. त्यामुळे या परिसरात भाजीवाल्यांचाही गराडा असतो. कचराकुंडीजवळच भाजी विक्रेते बसल्यामुळे आरोग्यविषयक संभ्रम अनेक नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. कचराकुंडीमुळे या परिसरात दरुगधीही पसरलेली असते.
कचराकुंडीजवळ असणाऱ्या अनेक हॉटेलांचा कचराही याच कचराकुंडीत टाकण्यात येतो. त्यामुळे ही कचराकुंडी सदैव दुथडी भरून वाहत असते. खडकपाडा, बेतुरकरपाडा, गोदरेज हील, लाल चौकी, टिळक चौक  या व अशा विविध भागांतून  नागरिक रिक्षा प्रवासाच्यामार्फत कल्याण रेल्वे स्थानकाचा पल्ला गाठत असतात. कचराकुंडीचा परिसर या प्रवासाच्या मार्गावरच असल्यामुळे रिक्षा प्रवासी व परिणामी रिक्षा वाहनांची येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
 
अयशस्वी प्रयत्न
तीन महिन्यांपूर्वी संबंधित कचराकुंडी या ठिकाणहून हलविण्यात आली होती. मात्र मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास बाहेरगावहून येणारे भाजीविक्रेते त्यांच्याजवळील कचरा या कचराकुंडीत टाकतात. त्यामुळे सकाळी सहा-सात वाजेपर्यंत या परिसरात कचऱ्याचा पसारा पाहायला मिळाला. त्यामुळे कचराकुंडी दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा आमचा प्रयत्न अयशस्वी ठरला, अशी माहिती महापालिकेच्या घन-कचरा विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

रेल्वे स्थानक परिसरातील या कचराकुंडीजवळ सतत कचरा पडलेला असतो. त्यामुळे दिवसभर या परिसरात दरुगधी असते. येथील भाजी विक्रेत्यांकडून दरुगधीमुळे भाजी खरेदी करण्याची इच्छा होत नाही. कचराकुंडीच्या परिसरातून प्रवाशांना चालणे अशक्य होत असले तरी त्याच घाणीतून प्रवासकरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महापालिकेकडून कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात येत नाही.
चिन्मय मालगुंडकर, कल्याण</strong>

महालक्ष्मी हॉटेलजवळील कचरकुंडीमुळे परिसरात वाहतूक कोंडीबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कचराकुंडीत भटक्या गायी, कुत्रे नेहमी चरत असतात. बाहेरगावाहून येणाऱ्या बसची येथे नेहमीच अडवणूक होत असल्याने एक मिनिटाच्या प्रवासासाठी १० ते १५ मिनिटे कळ सोसावी लागते. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दर तीन-चार तासांच्या फरकाने कचरा कुंडी साफ करणे गरजेचे आहे.
                                             – वैभव अडसूळ, कल्याण

समीर पाटणकर, कल्याण