वसईतील भुईगाव समुद्रकिनाऱ्याची दयनीय अवस्था; सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य
वसईतील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण म्हणजे वसईतील भुईगाव समुद्रकिनारा. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देत असले तरी किनाऱ्याची मात्र दुरवस्था झाली असल्याचे चित्र आहे. मद्यपींचा ढिंगाणा, बेसुमार वृक्षतोड, वृक्ष जाळपोळ, कचरा यांमुळे या समुद्रकिनाऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे.
भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी कुठल्याच प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. गेल्या चार ते पाच वर्षांत या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. परंतु मनपा प्रशासनाने याबाबत कुठल्याच सुविधा पुरवल्या नसल्याने हा सुंदर किनारा कचरामय झाला आहे. कचराकुंडी नसल्याने पर्यटक आपल्या सोबत आणलेल्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आजूबाजूला फेकून देतात. या समुद्रकिनाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी लाइट तसेच शौचालय, कपडे बदलण्याच्या खोलीची व्यवस्था नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

सुरूची वृक्षतोड
सुरूची झाडे हे या समुद्रकिनाऱ्यावरील वैभव आहे. किनाऱ्यालगतची शेकडो झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट झाली, तर उर्वरित झाडांना तस्करांनी आग लावून नष्ट केली. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेक मद्यपी ठाण मांडून बसलेले असतात. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी महिलांची छेड काढण्याचे, चोरीचे आणि मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत.
‘पालिकेने लक्ष द्यावे’
पर्यटनास चालना देणाऱ्या अशा स्थळांची अवस्था दयनीय होत असून याकडे वसई-विरार महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. येथील पर्यटन विकासावर पालिकेने जोर द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.