बेसुमारा रेतीउपसा सुरूच; उच्च न्यायालयाच्या आदेशाकडेही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मिल्टन सौदीया, वसई

वसईतील पाचूबंदर-किल्लाबंदर किनाऱ्यावर होत असलेल्या अनिर्बंध रेतीउपशामुळे किनारपट्टीची पूर्णत: दुर्दशा झाली असून किनारपट्टीवरील परंपरागत मच्छीमारांच्या शेकडो घरांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणच्या बेकायदा रेतीउपशास मज्जाव करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही रेती माफिया, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे स्थानिकांच्या मुळावर येणाऱ्या रेतीउपशाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून कोळीबांधक करीत आहेत.

बेकायदा रेतीउपशाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कोळी युवाशक्ती संघटनेने केला आहे. या बेकायदा रेतीउपशाविरुद्ध पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी स्थानिक मच्छीमारांनी सुरू केली आहे.

वसईतील पाचूबंदर-किल्लाबंदर किनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात धूप झाली आहे. त्यातच रेतीउपशाचे प्रमाण कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढत असल्याने पूर्ण किनाराच खचला असून पारंपरिक मच्छीमारांना मासळी सुकविण्यासाठीदेखील किनाऱ्यावर जागा राहिलेली नाही. पाचूबंदर-किल्लाबंदर किनाऱ्यावर सुमारे १५ हजारांहून जास्त पारंपरिक मच्छीमारांची वस्ती असून मासेमारी हा त्यांच्या उपजीविकेचा एकमेव व्यवसाय आहे. या ठिकाणी ३००च्या आसपास लहान-मोठय़ा मासेमारी बोटी आहेत. मात्र आता किनाऱ्याची प्रचंड धूप झाल्यामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पूर्वी पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात पाचूबंदर-किल्लाबंदर किनाऱ्यावर २०० ते २५० बोटी सुरक्षितरीत्या किनाऱ्यावर ठेवता येत होत्या. आता किनाराच नसल्यामुळे या भागात एकही बोट सुरक्षित ठेवता येत नाही. जमिनीची प्रचंड प्रमाणात धूप झाल्यामुळे समुद्राचे पाणी भरतीची सीमारेषा ओलांडून मच्छीमारांच्या राहत्या घरांना धडका देऊ  लागले आहे. किनाऱ्यावर बंधारा असला तरी लाटांच्या तडाख्याने बंधाऱ्याचे दगडही खिळखिळे झाले आहेत. परिणामी किनाऱ्यावरील शेकडो घरांना धोका निर्माण झाला आहे. वसई खाडीत अनेक वेळा स्थानिक मच्छीमार व बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये संघर्ष होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.  ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने २००६ मध्ये भाईंदर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडील भागात रेती उत्खनन करण्यास बंदी घातली होती.

‘तर किल्लाबंदर नामशेष होईल’

वसई खाडीतील रेतीउपशाविरोधात मागील १६ वर्षांपासून आम्ही आवाज उठवत आहोत. मात्र वसईची यंत्रणा कोमात गेल्याची स्थिती आहे. आता तर रेतीचोर पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन सॅण्डबारवर (वाळूचा लांबलचक उंचवटा) उतरून फावडे आणि घमेल्याच्या साहाय्याने किनारा अक्षरश: ओरबाडत आहेत. हा प्रकार पूर्णपणे बेकायदा आणि किनाऱ्याची वाट लावणारा आहे. खोल समुद्रातून किनाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या वेगवान लाटांची तीव्रता कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम सॅण्डबारमुळे होते. आता हा सॅण्डबारच उद्ध्वस्त करण्याचा उद्योग रेतीचोरांकडून होत आहे. सॅण्डबार नाहीसा झाल्यास पाचूबंदर-किल्लाबंदर हा भाग वसईच्या नकाशावरून गायब होण्याचा धोका आहे. असे   वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय कोळी म्हणाले.

वसईच्या खाडीतील रेतीउपशाचा फटका केवळ मच्छीमारांनाच नव्हे, तर पश्चिम पट्टय़ातील किनाऱ्यालगतच्या गावांतील पिण्याचे पाणी आणि बागायतींवरही अनिर्बंध रेतीउपशाचा विपरीत परिणाम झाला आहे. पर्यावरणाचा तर प्रचंड प्रमाणात ऱ्हास झाला असून किनाऱ्याची धूप झाल्यामुळे वसईचे सौंदर्यस्थळ असलेल्या सुरूच्या बागेतील झाडेही माना टाकू लागली आहेत. परिणामी येत्या काही दिवसांत ही बाग भकास दिसू लागेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

मॅकेन्झी डाबरे, पर्यावरण संवर्धन समितीचे कार्यकर्ते