ठाणे जिल्ह्यातील वेगाने शहरीकरणाच्या दिशेने प्रगती करत असलेल्या कुळगाव-बदलापूर शहराला करोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात करोनाचे पॉजिटीव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं होतं. परंतू बुधवारी तब्बल २९ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातच एकच खळबळ माजली आहे. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्येतली सर्वात मोठी वाढ असल्याचं समजतंय.

महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून येत आहे. बुधवारी आढळलेल्या २९ रुग्णांपैकी २२ रुग्ण हे याआधी करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते, ५ व्यक्ती या अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे प्रवास करत असल्याचं कळतंय तर उर्वरित दोन व्यक्तींना नेमका कशामुळे संसर्ग झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्याही तितकीच आश्वासक आहे, आतापर्यंत १३० जणं उपचार घेऊन घरी परतले आहेत. शहरात करोना बाधित रुग्णांची एकूण संघ्या २६१ झालेली असून आतापर्यंत ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरातील करोनाबाधित रुग्णांवर, पालिकेच्या रुग्णालयासोबत उल्हासनगर, ठाणे, डोंबिवली, भाईंदर, मुंबई येथे उपचार करण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने शहरातील ६१ रहिवासी संकुल प्रतिबंधीत केली आहेत.