कळवा-विटावा मार्गावर पाणी तुंबल्याने ठाण्यातील प्रमुख चौकांत वाहतूक कोंडी
गेल्या तीन दिवसांपासून अविरतपणे सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम राहिल्याने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे कळवा-विटावा मार्गावर पाणी साचल्यानंतर संपूर्ण ठाणे शहराचीच वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. या मार्गावर लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे कळवा चौक, साकेत, जिल्हा रुग्णालय, उथळसर, टेंभीनाका आणि जांभळीनाका अशा महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहने अडकून पडली. त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना संथगतीनेच वाहने पुढे न्यावी लागत होती.
ठाणे आणि नवी मुंबई शहरांतील वाहतुकीसाठी कळवा-विटावा हा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु सोमवारी या ठिकाणी पाणी साचल्याने नवी मुंबईच्या दिशेने निघालेली वाहने कोंडीत अडकून पडली. या कोंडीमुळे कळवा पुलापर्यंत वाहनांच्या लांब रांगा पोहोचल्या. परिणामी, कळवा पुलाला जोडणाऱ्या शहरातील विविध मार्गावर वाहतूक कोंडी झाली. कळवा चौक, साकेत, जिल्हा रुग्णालय, उथळसर, टेंभीनाका आणि जांभळीनाका अशा महत्त्वाच्या चौकांतील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या कोंडीत अर्धा ते पाऊण तास वाहने अडकून पडल्यामुळे चालकांसह प्रवासी हैराण झाले होते. अनेक मार्गावर कोंडीतून बाहेर पडण्यासाठी चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुसऱ्या बाजूवरील वाहतुकीचाही बोऱ्या वाजला. भर पावसात ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दुपारनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. रस्त्यावरील खड्डे तसेच मुसळधार पावसामुळे कळवा-विटावा मार्गावर कोंडी झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. या संदर्भात पालिकेकडून माहिती मिळू शकली नाही.

झाडांची पडझड
* संततधार पावसामुळे सोमवारी ठाण्यातील विविध भागांत ११ वृक्ष उन्मळून पडले. काही ठिकाणी झाडय़ांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. बाळकूम, ब्रह्मांड फेज- ८ आणि आझादनगर येथे संरक्षक भिंत पडून दोन कार आणि सहा दुचाकी वाहनांचे नुकसान झाले, तर कोपरी, पारसीवाडी येथील रतन सोसायटीमधील छताचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
* ठाणे शहरातील प्रमुख मार्गापैकी एक असलेल्या राम मारुती रोड या मार्गावरील विद्युत खांबावर झाड पडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने झाड बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.