राजकीय नेत्यांचे बंगले, दिवसेंदिवस वाढणारी हॉटेल्सची संख्या, अतिक्रमण होऊन उभी राहणारी गृहसंकुले, तेथील वणवे, प्राण्यांची शिकार, दारू पाटर्य़ा आणि तेथील कलकलाट या सगळ्या गोष्टींमुळे ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले येऊरचे जंगल नेहमीच चर्चेत राहिले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्यालगतचा हा भाग म्हणजे खरे तर शहराचे फुप्फुस. मात्र अतिक्रमणे आणि इतर उपद्रवांमुळे येऊरच्या या जंगलातील जीवसृष्टीला त्यांची नित्याची कामे करणेही कठीण होऊन बसले आहे. नियोजनाचा अभाव, हौसे-मौजेसाठीचे पर्यटन आणि वनविभागाच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे हे वन अनेक बाह्य़उपद्रवांचा सामना करत आहे. या भागातील माणसांची लुडबुड जरी थांबवली तरी या जंगलातील जैवविविधता टिकू शकेल, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
सकाळपासूनच दाखल होणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वाधिक मंडळी हे मॉर्निग वॉक आणि व्यायामाच्या निमित्ताने येतात. तर काही मंडळी छायाचित्रण, मौजमजा आणि पक्षी निरीक्षणसाठी येतात. मात्र येथील जैवविविधतेविषयी आदर आणि जैवविविधता कायमस्वरूपी टिकली पाहिजे याचे भान ठेवून येऊरला जाणाऱ्यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. मुख्य रस्ता टाळून जंगलातील वाटांनी या भागात फेरफटका मारणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी येऊर म्हणजे नंदनवन आहे. येथील घनदाट निसर्गराजीमध्ये वावरताना माणसांना चालण्याचे श्रम जाणवत नाहीत. त्यांचे सारे त्रास संपुष्टात येतात. ठाणे शहराचे पर्यावरण राखण्यातयेऊरच्या जंगलाचे मोठे योगदान आहे. येथे येणारे पर्यावरणप्रेमी ठाणेकरांना ही बाब पटवून देत आहेत. वृक्षराजींचे अनेक आणि वैविध्यपूर्ण प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात. पळस, पांगारा, उक्षी, मोई, वावळ, कुंभ, हुंब, ताड, काळापुरा, पेटारी, किनई, शिसम, कौशी, कळंब, हेपू यांसारखी हजारो प्रजातींची वृक्षसंपदा आहे.
येऊरच्या जंगलामध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये पर्यावरणप्रेमी नागरिकांना नवे हॉटेल्स, रिसॉर्ट किंवा बांधकाम झालेले दिसून येते. अतिक्रमणाचा हा वेग कायम राहिला तर पुढील दहा वर्षांमध्येच या परिसरातील नैसर्गिक वने नष्ट होऊन सिमेंटच्या जंगलांचे दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. केवळ आदिवासींसाठी असलेल्या या जंगलामध्ये ठाण्यातील अनेक बडय़ा राजकीय नेत्यांचे बंगले असून त्यांच्यावर न्यायालयाने टाच आणली होती. मात्र त्यातूनही राजकारणी मंडळींनी शोधलेल्या पळवाटांमुळे आजही हे बंगले या भागात बिनदिक्कत उभे आहेत.

काचांचा खच..
येऊरच्या भागामध्ये वनविभागाकडे अत्यंत मर्यादित प्रमाणात वन कर्मचारी आहेत. त्यामुळे या भागात येणाऱ्या बऱ्याचशा नागरिकांवर नियंत्रण राखणे त्यांना कठीण जाते. येऊरच्या जंगलामध्ये मोठय़ा प्रमाणात दारूच्या पाटर्य़ा होतात. विशेषत: पावसाळ्यात अशा प्रकारे तळीरामांच्या झुंडीच्या झुंडी जंगलावर आक्रमण करीत असतात. दारू पिऊन झाल्यावर ते रिकाम्या बाटल्या तिथेच फोडतात. त्यामुळे जंगलात सर्वत्र काचाच काचा होतात. येऊरच्या जंगलात त्यामुळे ठिकठिकाणी काचांचा खच आढळतो. या भागात काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था कैक हजार बाटल्या आणि काचा या भागातून पावसाळ्यानंतर उचलत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी आता वनविभागाच्या मदतीला सामाजिक संस्था आल्या आहेत.

येऊरच्या जंगलाविषयीच्या प्रतिक्रिया..
ज्यांच्याकडून या वनांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे किंवा ज्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता, अशाच राजकीय मंडळींनी या ठिकाणी अतिक्रमणे केली आहेत. तसेच जंगलात जाणारे सामान्य नागरिकही वनांना हानी पोहचवत असतात. त्यामुळे या दोन्ही घटकांचे उपद्रव रोखण्यासाठी विशेष कायदे करण्याची आवश्यकता आहे. तसे कायदे आपल्याकडे असले तरी त्यांची पुरेशी अंमलबजावणी अद्याप होत नाही. त्यामुळे अशा कायद्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. वनविभागाने मनुष्यबळ नाही, यासारख्या अडचणी सांगण्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे आणि अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेच्या मदतीने या भागाकडे कमी मनुष्यबळाच्या साहाय्यानेही नियंत्रण राखण्याची गरज आहे. अत्यंत दुर्मीळ जैवविविधता येऊरच्या जंगलात असून त्याची आज काळजी घेतली नाही तर भविष्यात त्यांचे अस्तित्व संकटात येईल. त्यामुळे येथील उपद्रव आपणच थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
– आदित्य सालेकर, पर्यावरणप्रेमी

येऊरच्या जंगलातील मानवी हस्तक्षेप थांबवा..
येऊरचे जंगल अत्यंत समृद्ध असून हे जंगल वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम उपाययोजनांची गरज भासत नाही. इथला निसर्ग त्याची स्वत:ची काळजी घेण्यास समर्थ आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मानवाने हस्तक्षेप टाळल्यास ही वने आपओप आपले समृद्धता राखू शकतील. या निसर्गाचा आनंद मात्र माणसाने मनमुराद घ्यावा. मात्र त्या वेळी त्या वनक्षेत्रात असलेले कायदे मात्र पाळावेत. चालण्यासाठी तयार करण्यात आलेला मार्ग सोडून विनाकारण जंगलातील प्रवेश टाळावेत, हॉर्न वाजवून प्राण्यांना त्रास देऊ नये. डीजे आणि अन्य वादनांचा त्रास त्यांना होऊ नये याची काळजी घेणे हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करूनच निसर्गाचा आनंद घ्यावा.
– सीमा हर्डीकर, निसर्ग अभ्यासक