नव्या पथदिव्यांसाठी कोटय़वधीचा खर्च

ठाणे : ठाणेकरांचा भविष्यातील प्रवास सुसह्य़ व्हावा यासाठी वडाळा ते कासारवडवली मेटो प्रकल्पाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामात बाधित होणारे रस्त्यालगतचे शेकडो पथदिवे हटवून त्याऐवजी याच भागात दुसऱ्या ठिकाणी नऊऐवजी सात मीटर उंचीचे सहाशेहून अधिक नवीन पथदिवे बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे पथदिव्यांची उंची कमी करण्यात आली आहे. या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत वडाळा ते कासारवडवली मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या प्रकल्पाची मार्गिका ठाणे शहरात मुंबई-नाशिक आणि घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग या ठिकाणाहून जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही महामार्गावर मेट्रोचे खांब उभारणीचे काम सुरू असून त्यावर आता गर्डर बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी या कामात अडसर ठरत असलेले वृक्ष तोडण्यात आले. त्यापाठोपाठ आता या कामात बाधित होणारे पथदिवे हटविण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या कामाची अंतिम निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. त्यामध्ये जुने पथदिवे हटवून त्या जागी नवीन पथदिवे बसविण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत ही कामे विभागण्यात आली होती. त्यानुसार तीन हात नाका ते कापुरबावडी जंक्शन या पहिल्या टप्प्यातील कामासाठी १ कोटी १२ लाख ५७ हजार, कापुरबावडी ते कासारवडवली या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २ कोटी ८७ लाख २२ हजार आणि कॅडबरी जंक्शन ते तीन हात नाका येथील हायमास्ट स्थालंतरित करण्यासाठी ६ लाख ५९ हजार ७८६ रुपयांच्या लघुत्तम निविदांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

सात मीटर उंचीचे पथदिवे

या मेट्रो मार्गाजवळील २२ केव्ही उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे नऊ मीटर उंचीचे खांब सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथे उभे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी सात मीटर उंचीचे चार पथदिवे लावून पुरेसा प्रकाश पडतो का याची खात्री करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने या ठिकाणी नऊऐवजी सात मीटर उंचीचे पथदिवे बसविण्यात येणार असून यामुळे पथदिव्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.

६०९ पथदिव्यांची उभारणी

तीन हात नाका ते कापुरबावडी जंक्शन या ठिकाणी १५६ तर कापुरबावडी ते कासारवडवली या ठिकाणी १७७ असे एकूण ३३३ पथदिवे आहेत. ते मेट्रो कामात बाधित होणार असून त्यापैकी अनेक पथदिवे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे हे पथदिवे काढून त्याच भागात दुसऱ्या ठिकाणी एकूण ६०९ पथदिवे बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये तीन हात नाका ते कापुरबावडी भागातील २०५ तर कापुरबावडी ते कासारवडवली भागातील ४०४ पथदिव्यांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिका विद्युत विभागाचे उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी सांगितले.