डोंबिवली एमआयडीसी, औद्योगिक परिसरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसा-ढवळ्या घरफोडय़ा करून ऐवज लुटून नेला जात आहे. मानपाडा पोलिसांकडून या चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत नाही. पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध करण्यासाठी डोंबिवली ग्रामीण भाजपतर्फे रविवारी, १२ एप्रिल रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
घरडा सर्कलमधील क्रीडासंकुलाच्या पदपथावर एमआयडीसीतील रहिवासी, औद्योगिक विभागातील उद्योजक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी या उपोषणात सहभागी होणार आहेत, असे ग्रामीण भाजपचे अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
एमआयडीसी निवासी विभागातील बहुतेक घरात ज्येष्ठ, वृद्ध मंडळी आहेत. बहुतेक कुटुंबांतील मुले नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशात आहेत. अनेक जण नोकरीनिमित्त मुंबई परिसरात जातात. घरात वृद्ध मंडळींच्या हतबलतेचा लाभ उठवून चोरटे चोरीसाठी या मंडळीच्या जिवावर उठण्याची भीती असते. एमआयडीसी भागात पाळत ठेऊन चोऱ्या केल्या जात आहेत. निखील कुलकर्णी, काशीनाथ तांबट यांच्या घरांतून लाखो रुपयांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरून नेण्यात आला. डॉ. धडस यांच्या घराशेजारील रस्त्यावर दुचाकी स्वारांनी महिलांजवळील सोनसाखळ्या हिसकावण्याचा प्रयत्न केला. माऊली सभागृहाजवळ खरेदीसाठी आलेल्या स्वप्निल किरकिरे याच्या वाहनातील ऐवज चोरटय़ांनी हातोहात लांबवला.
औद्योगिक विभागातील कारखान्यांमध्ये रात्रीच्या वेळेत घुसून चोरटे तेथील तांबे, पितळेच्या तारा चोरून नेत आहेत. चोरीसाठी कंपनीच्या खिडक्या, त्यावरील जाळ्या काढून नुकसान केले जाते. काही कंपनीमालकांनी मानपाडा पोलिसांना कंपनीत चोरी होताना कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालेले चित्रीकरण दिले. तरीही पोलीस चोरांचा छडा लावू शकले नाही. याशिवाय एमआयडीसी, औद्योगिक विभाग, ग्रामीण भागात झालेल्या चोऱ्यांचे अनेक गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दररोज नोंद होत आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. चोरांच्या भीतीने दिवसा घराला कुलूप लावून आत बसत आहेत. पोलीस या चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही प्रभावी उपाय योजत नाहीत.