येऊरच्या ग्रामस्थांकडूनच वाढता धोका
हिवाळा सुरू होताच समुद्र आणि खाडीकिनारी अनेक पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होत असते. बर्फाच्छादित हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रंगीबेरंगी पक्ष्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यात येऊरचे जंगले खुणावू लागते. हजारो मैल प्रवास करून येणारे हे रंगीबेरंगी, आकर्षक जंगली पक्षी दरवर्षी ठाणे आणि आसपासच्या परिसरातील पर्यावरण प्रेमींना पक्षी निरीक्षणाची पर्वणीच घेऊन येतात. त्यामुळे या काळात येऊरच्या जंगलांमध्ये छायाचित्रकार आणि पक्षी प्रेमींची मोठी गर्दी दिसून येते. हे जरी खरे असले तरी गेल्या वर्षांपासून या पाहुण्या पक्ष्यांची शिकार होऊ लागल्याचे धक्कादायक चित्र पक्षी प्रेमींना दिसू लागले आहे. अपुऱ्या ज्ञानाअभावी काही स्थानिक रहिवासी आणि पाटर्य़ाचे बेत आखत येऊरच्या जंगलाची वाट धरणाऱ्यांकडून ही शिकार होत असल्याच्या तक्रारी आहेत.
हिमालयात आढळणारे अल्ट्रामरीन फ्लायकॅचर, वर्डिटर फ्लायकॅचर, रेड ब्रिस्टेड फ्लायकॅचर, ब्लू कॅप्ड रॉक थ्रश, फॉरेस्ट वेगटेल, इंडयन पॅरेडाइज फ्लायकॅचर यासारख्या वेगवेगळ्या प्रजातीचे जंगली पक्षी दरवर्षी येऊर जंगलात वास्तव्यास येत असतात. हिमालयात हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टी होत असल्याने त्याठिकाणचे वातावरण या पक्ष्यांसाठी योग्य नसते. फ्लायकॅचर या नावाप्रमाणेच हे पक्षी फुलपाखरे, चतुर, किडे खातात. त्यामुळे हिमालयातील थंडीत त्यांना तेथील वातावरण पोषक नसते. मग खाद्याच्या शोधात या पक्ष्यांचे थवे मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, पश्चिम घाट असा लांब प्रवास करतात. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात येऊरच्या जंगलात ते स्थिरावतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत त्यांचे येऊरच्या जंगलात वास्तव्य असते. उन्हाळा सुरू होताच ते परतीच्या प्रवासाला निघतात.
येऊरमधील काही लहान मुले या पक्ष्यांची दगड किंवा बेचकी मारून शिकार करतात.
येऊरमध्ये सहलीसाठी जाणारे नागरिक मोठय़ा आवाजात गाणी लावतात. याशिवाय येऊरमध्ये वाढत जाणाऱ्या कॉंक्रिटीकरणामुळे घनदाट जंगल नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. या सर्वाचा विपरीत परिणाम या पाहुण्या पक्ष्यांवर होत असल्याचे काही पर्यावरण प्रेमींनी सांगितले.
या हिमालयीन पाहुण्यांच्या अस्तित्वाला धक्का लागू नये यासाठी येऊर पर्यावरण सोसायटीसारख्या काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

पक्ष्यांची हत्या होत आहे, असे अद्याप तरी निदर्शनास आलेले नाही. मात्र, असे प्रकार होत असतील तर त्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई केली जाईल.
– प्रतापसिंह रजपूत, उपवनाधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

येऊर जंगल परिसरातील आदिवासींमध्ये पक्षी किंवा पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती नाही. हिमालयातून येणाऱ्या पक्ष्यांबद्दलही त्यांना माहिती नसते. त्यामुळे खाण्यासाठी या तसेच अन्य पक्ष्यांचीही शिकार केली जाते.
– रोहित जोशी, संयोजक, नॅशनल एन्व्हायर्नमेंट वॉच