07 March 2021

News Flash

मालमत्ता नावावर करण्यासाठी पतीचा छळ

मोठय़ा शिताफीने या मंडळीच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर पतीने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले.

कल्याण : पतीला सतत सांगूनही घराची मालमत्ता आपल्यासह मुलाच्या नावावर करीत नाहीत म्हणून पत्नीने आपला मुलगा, भाचा, पुतण्या यांच्या सहकार्याने पतीला घरातील एका खोलीत दहा दिवस दोरीने बांधून डांबून ठेवले. मोठय़ा शिताफीने या मंडळीच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर पतीने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. या प्रकरणी पत्नी, मुलगा, भाचा, पुतण्याला पोलिसांनी अटक केली.

कल्याण पूर्वेमध्ये पावशेपाडा भागात रिक्षाचालक सुरेश पावशे राहतात. त्यांची तिथे घर आणि इतर मालमत्ता आहे. ही मालमत्ता आमच्या नावावर करा, अशी मागणी सुरेशची पत्नी, मुलगा अनेक दिवसांपासून करीत होते. आपण हयात आहोत, तात्काळ त्याची गरज नाही. तुमच्याच नावावर ही मालमत्ता करू, असे सांगून सुरेश त्यांची समजूत काढत होता. पती आपल्याला खोटे सांगून मालमत्ता नावावर करण्यास टाळत आहे, असा गैरसमज करून गेल्या आठवडय़ापूर्वी सुरेशची पत्नी, मुलगा निखिल, पुतण्या स्वप्निल, भाचा पुष्कर यांनी घरातील एका खोलीत बळाचा वापर करून रश्शीने सुरेशला बांधून ठेवले. मालमत्ता नावावर करीत नाहीत तोपर्यंत तुमची सुटका नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींची नजर चुकवून सुरेशने मोठय़ा शिताफीने सुटका करून घेतली आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पत्नीसह इतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज साळवे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. तडवी करीत आहेत. लाखो रुपयांची ही मालमत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:24 am

Web Title: husband harassment by wife over property issues zws 70
Next Stories
1 पाणी असूनही वसईकर तहानलेले
2 पालिकेची स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू
3 शहरबात  : आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाची गरज
Just Now!
X