नीलेश पानमंद

डोंगराचे अस्तित्व धोक्यात; महापालिकेचे वन विभागाकडे बोट

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर पारसिक रेतीबंदर येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या डाव्या बाजूच्या डोंगरउतारावर गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे वाढली असताना, आता मार्गिकेच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरही बेकायदा झोपडय़ा उभ्या राहत आहेत. या झोपडय़ा उभारण्यात स्थानिक गुंडांच्या टोळ्या कार्यरत असून त्यांच्याकडून एका झोपडीची दीड लाखाला विक्री केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा वन विभागाच्या हद्दीतील परिसर असल्याचा दावा करीत महापालिकेने हात झटकले आहेत.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. मुंब्रा शहरालगत असलेल्या डोंगरातून हा मार्ग तयार करण्यात आला आहे. डोंगराच्या मधोमध हा वळणरस्ता तयार करण्यात आला आहे. त्याला खेटूनच गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. पारसिक रेतीबंदर येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगरउतारावर ही बांधकामे उभी राहिली आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अवजड वाहन या बेकायदा वस्तीवर उलटल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. गेल्या वर्षभरात या मार्गिकेच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराच्या चढणीवरही मोठय़ा प्रमाणात बेकायदा झोपडय़ा उभारल्या आहेत. या झोपडय़ांना वीजपुरवठाही उपलब्ध झाला आहे. लाकडी बांबू आणि लोखंडी पत्र्याच्या साहय्याने झोपडी बांधली जात असून अशा एका झोपडीची दीड लाखामध्ये विक्री केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्य्राचा डोंगर परिसर येत असला तरी हा डोंगर वन विभागाच्या अखत्यारीत येतो. या दोन्ही विभागांतील समन्वयाच्या अभावाचा फायदा घेऊन गुंडांकडून झोपडय़ा उभारणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र त्याकडे या दोन्ही विभागांकडून दुर्लक्ष होत आहे. मुंब्य्राच्या डोंगरावर उभ्या राहिलेल्या बेकायदा झोपडय़ांसंदर्भात ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

डोंगराच्या सौंदर्याला बाधा

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील डोंगराच्या चढ भागावर उभारण्यात आलेल्या बेकायदा झोपडय़ांमुळे डोंगरावरील हिरवाई नष्ट होत आहे. या बांधकामांमुळे डोंगराचे अस्तित्व धोक्यात येऊ  लागले असून त्याचे सौंदर्यही नष्ट होत आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या खालचा परिसर महापालिकेच्या हद्दीत तर वरचा वन विभागाच्या अखत्यारीत येतो. या झोपडय़ांवर कारवाई करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. तिथे पाणीपुरवठा करण्यात येत नाही.

– झुंजार परदेशी, सहायक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती

अधिकृत की अनधिकृत बांधकाम आहे, याची पाहणी आम्ही करत नाही. आमच्याकडे विजेची मागणी करणाऱ्यांना आम्ही वीज देतो. वनविभागाने पत्र दिले तर वीजपुरवठा खंडीत करता येईल.

– पांडुरंग हुंडेकरी, कार्यकारी अभियंता, महावितरण