राज्यातील सत्तेत भागीदार असलेले भाजप आणि शिवसेनेत विस्तवही जात नसल्याचे अनेक किस्से अगदी ताजे असताना राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या एका वक्तव्याने या दोन पक्षांत पुन्हा एकदा कटुता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘‘ठाणे जिल्हय़ाचे पालकमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी मीच ठाण्याचा खरा पालकमंत्री असून बदलापूरसारखी शहरे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मी प्रयत्न करेन,’’ असे वक्तव्य तावडे यांनी बदलापुरात केले. एकनाथ शिंदे यांचे जिल्हय़ाकडे लक्ष नाही, असे दाखवून देण्याचा प्रयत्न तावडेंनी केल्याचे बोलले जात आहे.

बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा येथील क्रीडा संकुल आणि खुल्या मंचाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद तावडे उपस्थित होते. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांत तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये तुंबळ लढाई झाल्याचे चित्र होते. त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे असून या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे ठाण्यातील सर्वेसर्वा एकनाथ िशदे यांच्या जिल्हय़ातील वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याची चर्चा तावडे यांच्या वक्तव्यामुळे रंगली आहे.

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपच्या गोटात आखली जात असून यासाठी काही सनदी अधिकाऱ्यांचा पुरेपूर वापर केला जात असल्याची चर्चाही गेल्या काही महिन्यांपासून येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेत नाराजी

या पाश्र्वभूमीवर बदलापुरात एका कार्यक्रमासाठी आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या सरकारमधील अस्तित्वावर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे जिल्हय़ाचा पालकमंत्री कुणीही असोत, खरा पालकमंत्री मीच, या शब्दांत तावडे यांनी थेट एकनाथ िशदे यांच्यावर प्रहार केल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे.

‘जिल्हा क्रीडा संकुल बांधून देऊ’

खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल, त्याबाबतचा अध्यादेश लवकरच काढला जाईल, असे विनोद तावडे यांनी या कार्यक्रमात सांगितले. खेळाकडे मुलांचा कल वाढावा या हेतूने त्यांना वार्षिक परीक्षेत १० गुण अधिकचे दिले जातील, अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली. ठाणे जिल्हय़ात क्रीडा संकुलांची गरज आहे. त्यानुसार कोणत्याही महापालिकेने आम्हाला जमीन उपलब्ध करून द्यावी, आम्ही जिल्हा क्रीडा संकुल बांधून देऊ, त्यासंबंधीची तरतूद आगामी अर्थसंकल्पात केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.