रुग्णालयातील १३ कर्मचारी विलगीकरणात
डोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील आयकॉन रुग्णालयात करोनाबाधित चार रुग्ण सापडल्याने कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने बुधवारी हे रुग्णालय पाच दिवसांसाठी कुलूपबंद केले. या रुग्णालयातील १३ कर्मचाऱ्यांना पालिकेने त्यांच्या विलगीकरण केंद्रात १४ दिवसांसाठी हलविले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
पाच दिवसांपूर्वी आयकॉन रुग्णालयातील डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी आयकॉनमधील दोन कर्मचारी तसेच परिसरातील एक तरुणही करोना चाचणीत सकारात्मक आला. बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील १३ कर्मचाऱ्यांना पालिकेने भिवंडी वळण रस्त्यावरील टाटा आमंत्रण येथील विलगीकरण कक्षात स्थलांतरित केले आहे. हे कर्मचारी कल्याण, डोंबिवली, शहापूर तालुका परिसरातील आहेत. या रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. आयकॉन रुग्णालय आणि अयोध्यानगरी परिसर पालिका आणि पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी रुग्णालय बंद करण्याची डोंबिवलीतील ही पहिलीच घटना आहे. रुग्णालय, परिसरात पालिकेने र्निजतुकीकरणाची फवारणी सुरू केली आहे. विलगीकरणात गेलेले कर्मचारी राहत असलेल्या भागात निर्जंतुकीकरण केले जाईल, असे साहाय्यक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले. दरम्यान गेल्या आठवडय़ात शास्त्रीनगर रुग्णालयातून विलगीकरणात ठेवलेला आयरे गावातील तरुण रुग्णालय प्रशासनाला अंधारात ठेवून पळून गेला होता. अशीच घटना काल घडली. पालिकेने ताब्यात घेतलेल्या एका खासगी रुग्णालयातील करोनाबाधित रुग्ण उपचार सुरू असताना पळून गेला. पोलिसांनी अटोकाट प्रयत्न करून त्याला लपून बसलेल्या भागातून ताब्यात घेतले.
आयकॉन रुग्णालयात करोनाबाधित रुग्ण सापडल्याने संसर्ग टाळण्यासाठी हे रुग्णालय पालिका प्रशासनाने पाच दिवसांसाठी बंद ठेवल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाला कळविले आहे.
-डॉ. राजू लवांगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कडोंमपा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 12:09 am