वेळप्रसंगी मित्रही वैरी बनतात आणि अगदी जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. कल्याण शहरात अशीच एक घटना घडली. किरकोळ वादातून तिघांनी मित्राचा खून केला तसेच या गुन्ह्य़ाचा सुगावा लागू नये म्हणून हातपाय बांधून मृतदेह खाडीत फेकला. मात्र खिशात सापडलेल्या एका ओळखपत्रामुळे मृताची ओळख पटली आणि त्याच्या खुनाचा उलगडा झाल्याने तिघांची कारागृहात रवानगी झाली.

चा र महिन्यांपूर्वीचा प्रसंग. कल्याण शहरातील खाडीजवळील गणेशघाट भागात एका तरुणाचा मृतदेह पडला होता. या घाटाजवळील चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने तपास सुरूकेला. मृत व्यक्ती ३० ते ३५ वयोगटांतील असावी, असा पोलिसांनी निरीक्षणातून अंदाज बांधला, तसेच मृताचे दोन्ही पाय नायलॉन दोरीने बांधण्यात आले होते आणि चेहरा विद्रुप करण्यात आला होता. हे हत्येचे प्रकरण होते. पण चेहरा ओळखता येत नसल्याने मृताचे नाव समजू शकत नव्हते. पोलीस यावर विचार करत असतानाच मृताच्या खिशात एक ओळखपत्र सापडले आणि तपासाची चक्रे फिरली.
तरबेज आरिफ डांगे (३२) असे मृताचे नाव होते. त्याची ओळख पटली असली तरी त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. त्यामुळे पोलिसांच्या पथकांनी विविध अंगांनी तपास सुरू केला. दुसरीकडे भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू केला. पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार व भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावण्यासाठी विशेष पथके तयार केली. त्यामध्ये पोलीस हवालदार विकास शिरसाठ आणि इतर कर्मचारी होते.
भिवंडी येथील निजामपुरातील बौद्धवाडा भागात तरबेज राहायचा. पत्नी आणि दोन मुले असा त्याचा परिवार. रिक्षा तसेच टेम्पो ही वाहने चालविण्याचे काम तो करीत होता. मात्र, तो सर्व प्रकारच्या नशेचे सेवन करायचा. या कारणावरून त्याचे पत्नीसोबत सतत खटके उडायचे. यातूनच पत्नीने त्याची हत्या केली असावी, असा पोलिसांचा सुरुवातीला संशय होता. यामुळे भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी याच दिशेने तपास सुरू केला. पण पत्नीकडून त्याच्याबाबत काही ठोस माहिती मिळाली नाही. तिच्या चौकशीतही काही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे पथकांनी तपासाची दिशा बदलली. त्याच्या मित्रमंडळी तसेच ओळखीच्या व्यक्तींची चौकशी सुरू केली. सुमारे ४०- ५० जणांची या प्रकरणात कसून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मित्र हर्शियान रशिद दळवी ऊर्फ मोगली याच्या बोलण्यात तफावत असल्याचे आणि तो अडखळत उत्तरे देत असल्याचे जाणवले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. हर्शियान निजामपुरामधील एका तबेल्यात काम करायचा तसेच तरबेजच्या खुनानंतर तो महिनाभर फरार होता, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला. या संशयाच्या जोरावरच हर्शियानला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. तसेच तरबेजची हत्या कशी केली, त्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.
हनी ऊर्फ सद्दाम, रवीश बाऊद्दिन आणि सद्दाम हे तिघे कल्याण दुर्गाडी येथील चौपाटी परिसरात फिरायला गेले होते. तिथे मद्यपान करून फेरफटका मारून घरी परतत असताना त्यांना तरबेज भेटला. त्यावेळी सहज बोलता बोलता त्यांच्यात किरकोळ वाद झाला. यातूनच त्या तिघांनी तरबेजला बेदम मारहाण केली. त्यानंतर एका दोरीने हातपाय बांधून त्यांनी त्याला खाडीत फेकून दिले, अशी सविस्तर हकिकत त्याने पथकाला सांगितली. त्यानुसार या प्रकरणात पथकाने हनी ऊर्फ सद्दाम रविश बाऊद्दिन याला अटक केली तर सद्दाम अद्याप फरार आहे.