कोरस टॉवर्स समूह
वाढत्या लोकसंख्येच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी मोकळय़ा जमिनींवर  किंवा जुन्या वसाहतींच्या जागेवर नव्याने टोलेजंग टॉवर्स किंवा टाउनशिप उभ्या केल्या जातात. मोठा गाजावाजा करून त्यांच्या जाहिरातीही केल्या जातात. पण हळूहळू या टॉवर्सच्या परिसरातील नागरी समस्या डोके वर काढू लागतात आणि महागमोलाने येथे घरे घेणाऱ्यांना मनस्तापासोबत पश्चात्ताप होऊ लागतो. पण वर्तकनगरमध्ये एकेकाळी काबर्न पेपरचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीच्या जागेत उभे राहिलेल्या ‘कोरस टॉवर्स’ समुहातील इमारती याला नक्कीच अपवाद आहेत. विकासकाच्या ताब्यात देण्यापेक्षा ‘कोरस’ने स्वत:च विकसित केलेल्या या गृहसंकुलात अन्य इमारतींनी आदर्श घ्याव्यात, अशा अनेक गोष्टी आहेत.
ठाण्यात आता पूर्वद्रूतगती महामार्गाच्या पलीकडे वसलेल्या नव्या शहरात पूर्वी अनेक लहान-मोठय़ा कंपन्या होत्या. ऐंशीच्या दशकात महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहराचा परिघ आणि लोकवस्ती वाढली. त्यानंतर हळूहळू कंपन्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. साधारण ९०च्या दशकात या प्रक्रियेने अधिक वेग घेतला. कंपन्यांच्या जागी गृहसंकुले उभी राहिली. वर्तकनगर परिसरातील कोरस टॉवर्स समूह त्यापैकी एक. लिखित दस्तऐवजाची नक्कल प्रत काढण्यासाठी लागणाऱ्या कार्बन पेपरचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीच्या आवारात त्याच नावाने १४-१५ मजली पाच टॉवर्स उभारण्यात आले. अनेक कारणांमुळे ठाण्यातील इतर सोसायटय़ांपेक्षा ही वसाहत वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यातील ठळक बाब म्हणजे इतर कंपन्यांप्रमाणे कोरसने आपली जागा कोणत्याही विकासकाच्या ताब्यात दिली नाही. त्याऐवजी कोरस रिअल इस्टेट नावाने स्वतंत्र विभाग सुरू करून त्याद्वारे त्यांनी या इमारती उभारल्या. आनंद, नेहा, नंदिनी, देवप्रिया आणि रेखा अशा या पाच इमारती आहेत. येथील सर्व सदनिका एकसारख्या म्हणजे ८९० चौरस फुटांच्या आहेत. दोन शयनकक्ष, दिवाणखाना आणि स्वयंपाकघर अशा स्वरूपाची ही निवास व्यवस्था आहे. उच्च दर्जाचे बांधकाम, पुरेशी मोकळी जागा, गर्द हिरवाई यामुळे कोरसमधील वास्तव्य सुखदायक असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. अंतर्गत रस्ते काही प्रमाणात उखडलेले असले तरी एकुणात हे एक गोजिरवाणे गृहसंकुल आहे.
आनंदमेळा
कोरस संकुलातील सर्व पाचही इमारतींची आपापली स्वतंत्र सोसायटी आहे. शिवाय सर्व टॉवर्स मिळून एक सामायिक सोसायटीही आहे. डिसेंबर महिन्यात सर्व पाचही इमारती मिळून एक दिवस आनंदमेळा भरवितात. त्यात वसाहतीतील सर्व रहिवासी सहभागी होतात. अनेकजण या आनंदमेळ्यात विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल्स लावतात. सर्वसाधारणपणे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा हेतू नफा मिळविण्यापेक्षा आनंद मिळविणे हा असतो. या सोहळ्यात सोसायटीतील सर्व सभासद सहभागी होतात. सर्व प्रांतातील, जातीधर्माचे रहिवासी कोरसमध्ये राहतात आणि एकत्रितरीत्या सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे करतात.
बारमाही पाण्याची विहीर
योग्यरीत्या ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या या वसाहतीने अद्याप पर्जन जलसंधारण योजना राबविलेली नाही. मात्र कंपनीच्या आवारात असलेल्या पुरातन विहिरीने ती उणीव भरून काढली आहे. कोरसमध्येच राहणाऱ्या जल व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या विहिरीची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे येथील झऱ्यांना नवसंजीवनी मिळाली. येथील पाण्याची रीतसर चाचणीही करण्यात आली. त्यानुसार हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा निर्वाळाही देण्यात आला आहे. विहीर बारमाही असून आपत्कालीन परिस्थितीत सोसायटीतील रहिवाशांना त्याचा उपयोग होतो.
अनधिकृत पार्किंगचा जाच
वसाहतीत फारशा समस्या नसल्या तरी बाहेर रस्त्यावरील अतिरेकी पार्किंगचा येथील रहिवाशांना फार त्रास होतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक गाडय़ा लावलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या भेडसावते. त्यातील काही गाडय़ा तर महिनोन् महिने पडून आहेत. वाहतूक विभागाने या अनधिकृत पार्किंगची दखल घ्यावी, अशी अपेक्षा कोरसवासी बाळगून आहेत.
ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन
कचरा व्यवस्थापन ही सर्वच महानगरांना भेडसाविणारी सध्याची मोठी समस्या आहे. मात्र गृहसंकुलांनी ठरविले, योग्य नियोजन केले तर त्यातून मार्ग निघू शकतो, हे कोरसवासीयांनी दाखवून दिले आहे. सोसायटीतील रहिवासी डॉ. लता घनश्यामनानी आणि शैला कामत या दोघींनी पुढाकार घेऊन सोसायटीत सामूहिकरीत्या कचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. सोसायटीतील सेवकांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्याद्वारे गांडूळ खत प्रकल्पाचे व्यवस्थापन होते. प्रकल्प यशस्वी व्हावा म्हणून सोसायटीने प्रत्येक कुटुंबाला या प्रकल्पाची नीट माहिती दिली. घरातच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यास सांगितले. त्यासाठी प्रत्येक घरात सोसायटीच्या वतीने कचरा संकलन करण्यासाठी पिशवी देण्यात आली. गांडूळ खत प्रकल्पात शिजविलेले अन्न वगळून इतर सर्व स्वयंपाक घरातील ओला कचरा टाकता येतो. शिवाय सोसायटीच्या आवारातील झाडांचा सर्व पालापाचोळाही न जाळता त्याचे खत करण्यात येते. कोरस सोसायटीची स्वतंत्र हरित समिती असून डॉ. लता आणि इतर पर्यावरणस्नेही उपक्रम राबविणारे रहिवासी या समितीचे कामकाज पाहतात. महापालिकेच्या वतीने ‘ग्रीन ठाणे’ पुरस्कार देऊन कोरस सोसायटीचा गौरव केला आहे. या प्रकल्पातून तयार होणारे खत सोसायटीतील उद्यानांमध्ये वापरले जाते. सोसायटीतील अडगळीच्या जागेत या खताद्वारे सुंदर बाग फुलली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविला जात असून आता ठाण्यातील इतर सोसायटय़ाही त्याचे अनुकरण करू लागल्या आहेत.   
हवीहवीशी हिरवाई
नव्या ठाण्यातील इतर वसाहतींच्या तुलनेत रेल्वे स्थानकापासून कोरस टॉवर जवळ म्हणजे चार किलोमिटर अंतरावर आहे. त्यात कंपनीने टॉवर उभारताना येथे असलेल्या हिरव्या वनराईला फारसा धक्का लावलेला नाही. त्यामुळे शहरातील इतर सोसायटीत अभावानेच आढळणारे मोठमोठे वृक्ष या सोसायटीच्या आवारात दिमाखाने उभे आहेत. गावाकडे असतो तसा पिंपळाचा विस्तीर्ण पारही वसाहतीत आहे.  
उद्यान आणि मैदान
कोरस सोसायटीचे आणखी एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे या पाच इमारतींच्यामध्ये भरपूर मोकळी जागा आहे. त्यामुळे वाहने पार्किंगची समस्या नाही. शिवाय सोसायटीच्या आवारात तीन उद्याने आहेत. त्यात मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळणी आहेत. उद्याने, क्लब हाऊस आदी सुविधा तर अन्य वसाहतीतही हल्ली असतात, पण याशिवाय कोरसमध्ये मुलांना खेळण्यासाठी चक्क मैदानही आहे. पाचही इमारतींसाठी मिळून कोरसमध्ये एक क्लब हाऊस आहे. सोसायटीतील रहिवाशांना घरगुती समारंभांसाठी ते उपलब्ध करून दिले जाते.
प्रशांत मोरे