कल्याणमध्ये राज ठाकरे यांचे टीकास्त्र
दुष्काळ पहिले जाहीर करा. मग दुष्काळासाठी कर लावा. एक वर्षांत ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,’ अशी स्थिती भाजपने केली आहे, अशी घणाघाती टीका करताना महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळ करावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी कल्याणमधील मेळाव्यात कोरडे ओढले. कामगार पगाराच्या दिवशी एकत्र येतात, त्याप्रमाणे हे शिवसेना-भाजपवाले टेंडर, टक्केवारी असली की युती करतात, असा टोलाही त्यांनी हाणला.
आतापर्यंत पालिकेत एकत्र राहिलेले शिवसेना-भाजप पक्ष आता वेगळे लढत आहेत. या दोन्ही पक्षांनी या पालिकेला लुटले. कल्याण-डोंबिवली शहरांचे धिंडवडे काढले. त्यांच्यापासून सावध राहा, असे आवाहन त्यांनी येथील पदाधिकारी मेळाव्यात केले. पैशाचे राजकारण शिवसेना, भाजपने सुरू केले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि यांच्यात फरक काय, असा सवाल राज यांनी करीत या दोन्ही पक्षांना टीकेचे लक्ष्य केले.
सत्तेवर येऊन एक वर्षही लोटले नाही तर भाजपवाले कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर येऊन पॅकेजेस वाटप करू लागले आहेत. जाहीर केलेले पॅकेज ते देतीलच याची खात्री काय, असा प्रश्न राज यांनी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपवाले महाथापाडे आहेत, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री स्वत:च्या हिमतीवर बसलेला असला पाहिजे. हा माणूस नाष्टय़ाला काय खाऊ हे सुद्धा मोदींना विचारतो, अशी त्यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली. एक परदेशी बाई देशात येऊन दहा वर्षे राज्य करते आणि यांना राज्य दिले तर हे परदेशी दौरे करीत आहेत, अशा शब्दात नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
कल्याण-डोंबिवलीत चौकाचौकांत पुतळे उभारले आहेत. त्यापेक्षा लोकांना सुविधा द्या. अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेपेक्षा दोन इंच उंच छत्रपतींचा पुतळा उभारण्याची टूम कोणी काढली? हा अवाढव्य खर्च करण्यापेक्षा पहिले गडकिल्ले सुधारा. छत्रपतींचा विचार त्या निमित्ताने जिवंत राहील, असे राज यांनी सांगितले.