मुंब्रा स्थानकात खजूर, फळे व खाद्यपदार्थाचे मोफत वाटप

ठाणे : मुस्लीम धर्मीयांतील पवित्र महिना असलेल्या रमजानमधील रोजे (उपवास) सध्या पाळले जात आहेत. मात्र नोकरी-धंद्यानिमित्त घराबाहेर असलेल्यांना विशेषत: लोकलमधून प्रवास करणाऱ्यांना उपवास सोडण्याची वेळ (इफ्तार) पाळणे अनेकदा कठीण जाते. अशा प्रवाशांसाठी मुंब्रा रेल्वे स्थानकात दररोज इफ्तारीचे आयोजन करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर गाडीत बसलेल्या प्रवाशांनाही वेळेवर रोजा सोडता यावा, यासाठी फलाटावर काही सेवेकरी खजूर आणि फळांचे वाटपही करताना दिसतात.

रमजान हा मुस्लीम धर्मातील महत्त्वाचा महिना असतो. या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जळी उपवास पाळण्यात येतो. सूर्यास्तानंतरच्या एका ठरावीक वेळेवर दररोज रोजा सोडण्यात येतो. यासाठी ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये तसेच काही सार्वजनिक ठिकाणीही इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात येते. मात्र मुंबई-ठाण्यासारख्या शहरांत नोकरी-धंद्यानिमित्त अनेक जण दिवसभर घराबाहेर असतात. अनेकदा रेल्वे प्रवासातच रोजा सोडण्याची वेळ टळून जाते. अशा मुस्लीम बांधवांची आबाळ लक्षात घेऊन मुंब्रा परिसरात राहणाऱ्या १५-२० जणांनी दररोज सायंकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान मुंब्रा रेल्वे स्थानकात इफ्तारीचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. ही मंडळी स्वखर्चाने खजूर, फळे आणि अन्य खाद्यपदार्थाची व्यवस्था करतात व स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना निमंत्रण देत असतात.

मुंब्य्रातच राहणारे मोहम्मद यासीन गेल्या १८ वर्षांपासून स्थानकात प्रवाशांना खजूर वाटत आहेत. प्रत्येक मिनिटाला येणाऱ्या लोकलच्या प्रवाशांना ‘दूर जाने वाले खजूर ले लो..’ आवाज देतात. त्यांच्या हातात असलेल्या ताटातील एक-एक खजूर उचलून पुढे जातात. ‘आम्ही दररोज संध्याकाळी अर्धा तास रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना खजूर देतो. तर इफ्तारीच्या वेळेत ज्या प्रवाशांना वेळेवर घरी जाता येत नाही, त्यांच्यासाठी रेल्वे स्थानकातच फळ, भजी देण्यात येतात,’ असे यासीन म्हणाले. संपूर्ण महिनाभर १५ ते १८ किलो खजूरवाटप दरवर्षी करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.

या सेवेकऱ्यांच्या कार्याबाबत प्रवासीही समाधान व्यक्त करतात. ‘इफ्तारीची वेळ झाल्यानंतर तत्काळ खजूर खाऊन रोजा सोडवा लागतो. अशा वेळी वेळेत घर गाठता आले नाही तर मुंब्रा स्थानकात ती व्यवस्था होते,’ असे मेहरुबा जुबेर यांनी सांगितले. कुर्ला येथून आलेल्या मुस्ताखी शाह यांचीही रोजा सोडण्याची वेळ टळणार होती. मात्र मुंब्रा स्थानकात इफ्तारीची व्यवस्था झाल्याने त्यांनी सेवेकऱ्यांचे आभार व्यक्त केले.

मोफत बस सेवा

मुंब्रा परिसरातील बहुसंख्य रिक्षाचालक मुस्लीम आहेत. रमजानच्या काळात यापैकी अनेक जण रिक्षाचा व्यवसाय बंद ठेवतात. साहजिकच स्थानकातून अन्य परिसरात जाण्यासाठी रिक्षांची कमतरता जाणवते. अशा प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी काही जणांनी या भागात मोफत बस सेवाही सुरू केली आहे.