सिमेंट रस्ते अहवालात केवळ क्षुल्लक त्रुटी दिल्याचा प्रशासनाचा दावा

भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात अधिक दराने निविदा काढून देखील निष्कृष्ट दर्जाचे काम झाले असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार या रस्त्याची तपासणी करण्याचे निर्देश आयआयटीला देण्यात आले होते. मात्र आयआयटीच्या अहवालात काही रस्त्याची दुरुस्ती अथवा पुनर्निर्मिती करण्याचे आदेशच देण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र इतक्या स्पष्ट तक्रारी दिल्यानंतर देखील आयआयटी विभागाचा अहवाल अशा पद्धतीने आल्याने हे विभाग पालिका प्रशासनाला अभय देत असल्याचे आरोप तक्रारदारांकडून करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात नव्याने सीमेंट काँक्रीट रस्ता निर्मितीचे काम करण्यात येत आहे. मात्र या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप वारंवार पालिका प्रशासनाला करण्यात आले आहे. यात शहरातील आठ रस्ते सीमेंट काँक्रीटचे करण्यासाठी महापालिकेने सहा संस्थांना २०१९ मध्ये ठेका देण्यात आला होता. यातील सेव्हन इलेव्हन शाळा ते दीपक रुग्णालय येथील रस्ता सीमेंट काँक्रीटचा करण्यासाठी ३० टक्के जास्त दराने ३ कोटी ७९ लाखांचे कंत्राट  देण्यात आले होते.

मीरा रोडच्या शांतीनगर चौक ते कुणाल शॉपिंग सेंटपर्यंतचा रस्ता यूटीडब्लूटी काम करणे कामाची निविदा २६ टक्के जास्त दराने देण्यात आली. मीरा रोड येथील नरेंद्र पार्क ते उड्डाणपूलपर्यंतचा रस्त्याच्या कामाची  निविदा २६ टक्के जास्त दराने देण्यात आली. तर शीतल नगर ते साई बाबा नगर येथील २३.५० टक्के जास्त दराने ११ कोटी ५२ लाखांचा ठेका देण्यात आला आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. त्यावर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने कोकण विभागीय आयुक्तांना चौकशी करून एक महिन्याच्या  आत शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याच गोष्टीची दखल घेत मनपा आयुक्तांनी रस्त्याच्या कामाची आयआयटीच्या तांत्रिक शाखेकडून तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महिन्याभरापूर्वी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या सीमेंट काँक्रीटच्या रस्त्याची पाहणी आयआयटीच्या तांत्रिक शाखेकडून प्रत्यक्षात  करण्यात आली होती.

त्यानुसार आता या विभागाने अहवाल तयार केला असून प्रशासनाला सुपूर्द केला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात कोणत्याही प्रकारचा घोळ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ काही ठिकाणी तांत्रिक घोळ दिसल्याने त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुराव्यासह करण्यात आलेल्या तक्रारी नंतरदेखील आयआयटी विभागाला त्रुटी न मिळाल्यामुळे हे विभाग पालिका प्रशासनाला अभय देत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

अधिकारी व कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न

मीरा-भाईंदर शहरातील रस्ते निर्मितीच्या कामात घोळ झाल्याची तक्रार पुराव्यासह पालिका प्रशासनाला करण्यात आली होती. त्यामुळे या कामाची तपासणी करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने कोकण विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आयआयटीमार्फत या रस्त्याची तपासणी करण्यात आली. मात्र रस्ते कामात घोळ असल्याचे निष्पन्न झाल्यास अनेक कंत्राटदार काळ्या यादीत जाऊ शकतील व अधिकारीदेखील अडचणीत येऊ शकण्याच्या भीतीने आयआयटी विभागाने नरम भूमिका घेतली असल्याचे आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहेत.

आयआयटी विभागाचा अहवाल आला असून त्यात ज्या रस्त्यात त्रुटी आढळून आल्या आहेत त्याची नव्याने निर्मिती करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार त्या त्या रस्त्याची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग