भाईंदर : मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात मीरा भाईंदर शहरातील पोलीस प्रशासनाकडूनच चक्क बेकायदा जाहिरातबाजी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याकरिता झाडाचा वापर करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

पोलीस प्रशासनाच्या जाहिरातीवर जनहितार्थ माहिती देण्यात आली असली तरी हे फलक थेट रस्त्यावरील चौकात झाडाच्या आधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे जर पोलीस प्रशासनच नियम मोडणार असेल तर इतर नागरिक नियम कसे पाळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. म्हणून पोलीस प्रशासनावरदेखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी वर्गाकडून करण्यात येत आहे.

याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, बेकायदा लावण्यात येणाऱ्या जाहिरातीवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. तसेच आता मिळालेल्या तक्रारीनुसार या संदर्भात पाहणी करून लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.