उल्हासनगरमध्ये पोलिसांची कारवाई; राजकीय पक्षांच्या फलकांकडे मात्र दुर्लक्ष

उल्हासनगर शहरात राजकीय नेत्यांच्या फलकबाजीला ऊत आला असून त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. याला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन कमी पडत असतानाच स्थानिक पोलिसांनी अशा फुकटय़ा जाहिरातदारांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.

जन्म, बारशापासून साखरपुडा, लग्न, वाढदिवस आणि इतर अनेक कारणांसाठी फलकबाजी केली जात आहे. उल्हासनगर शहरात फलक निर्मितीचा मोठा व्यवसाय आहे. येथे फलक निर्मितीचा खर्चही कमी असल्याने फलक छापून घेण्याकडे राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्ती, संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी यांचा कल आहे.

विविध मोकळ्या जागा, चौक, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांनी नेमून दिलेल्या जाहिरातीच्या जागा, रोहित्र, विजेचे खांब, इमारती अशा ठिकाणी या जाहिराती विनापरवानगी लावल्या जात आहेत. स्थानिक महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येण्यापूर्वीच या जाहिराती काढल्याही जातात. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या जाहिराती शहराच्या विद्रूपीकरणात भर घालत आहेत. त्यामुळे असे फलक, जाहिरातीचे फलक, झेंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.

स्थानिक पोलिसांनी या बॅनरबाजीला चाप लावण्यासाठी पावले उचलली आहेत.

गेल्या तीन दिवसांत अनेक फुकटय़ा जाहिरातदारांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक अधिनियन १९९५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात खासगी शिकवणी वर्ग, संस्था, संघटना आणि व्यक्तींचा समावेश आहे. जाहिरातबाजीत आघाडीवर असलेल्या राजकीय पक्षांच्या फलकबाजीवर मात्र पोलिसांनीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अंबरनाथ, बदलापुरातही कारवाई हवी

उल्हासनगरपासून जवळच असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातही मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर फलकबाजीला ऊत आला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा करही बुडत असून शहराच्या विद्रूपीकरणात भरही पडत आहे. त्यामुळे स्थानिक पालिका प्रशासन किंवा पोलिसांकडून या फुकटय़ा जाहिरातदारांच्या विरोधात कधी कारवाई केली जाणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.