ऑनलाइन घरविक्री झाल्याचे उघड; घरे न घेण्याचे प्रभाग अधिकाऱ्याचे आवाहन

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील नांदिवली येथील तलावाजवळ भूमाफियांनी सात माळ्यांची बेकायदा इमारत बांधून पूर्ण केली आहे. ही इमारत पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. अल्प किमतीत या बेकायदा इमारतीमधील सदनिका ऑनलाइन पद्धतीने विकल्या जात आहेत. होणारी फसवणूक टाळण्यासाठी या बेकायदा इमारतीत रहिवाशांनी सदनिका खरेदी करू नयेत, असे आवाहन ई प्रभागाचे प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी केले आहे.

तीन वर्षांपूर्वी नांदिवली पंचानंद येथील नांदिवली तलावाजवळ पालिकेच्या परवानग्या न घेता भूमाफियांनी सात माळ्यांची बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले. या तीन वर्षांच्या काळात या इमारतीवर ई प्रभागाच्या तत्कालीन प्रभाग अधिकाऱ्यांनी तोडण्याची जुजबी कारवाई केली होती. त्यामुळे माफियांनी ही इमारत पुन्हा उभारणीचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. दोन वेळा कारवाई होऊनही माफियांनी ही बेकायदा इमारत पुन्हा उभारून त्यामधील सदनिका ऑनलाइन, कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना अल्प किमतीत विकण्यास सुरुवात केली आहे. घरविक्रीसाठी मुंबईतील झोपडपट्टी, बोरिवली, मालाड, कांदिवली पश्चिम उपनगरांतील, कोकणपट्टय़ातील चाळ, झोपडी भागातील रहिवाशांना लक्ष्य केले जात आहे. घरविक्री करताना इमारत अधिकृत असल्याचा दावा माफिया करतात. त्यांना बनावट कागदपत्रे दाखवतात, असे प्रभाग अधिकारी पवार यांनी सांगितले. नांदिवली तलावाजवळ प्रशस्त जागेत सात माळ्यांची इमारत उभी राहत असताना पालिका आयुक्त, नियंत्रक अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, बीट मुकादम, प्रभाग अधिकारी शांत का राहिले, असे प्रश्न जाणकार रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

नांदिवली तलावाजवळ माफियांनी सात माळ्यांची इमारत बांधली असली तरी ही इमारत यापूर्वी बेकायदा म्हणून घोषित केली आहे. माफिया या इमारतीचे बांधकाम, परवानगीची कागदपत्रे दाखल करू शकला नाही. रहिवाशांची फसवणूक टाळण्यासाठी ही इमारत लवकरच मानपाडा पोलिसांचा बंदोबस्त मिळाला की भुईसपाट केली जाईल.

– भारत पवार, प्रभाग क्षेत्र अधिकारी, ई प्रभाग