|| ऋषीकेश मुळे

डोंबिवलीतील कांदळवनांवर बैठय़ा चाळींची उभारणी

बेकायदा घरांच्या खरेदी-विक्रीवर र्निबध यावेत यासाठी ‘रेरा’सारखा कायदा काटेकोरपणे राबवण्यात येत असताना डोंबिवलीतील कोपर भागातील कांदळवनांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या बेकायदा घरांची थेट फेसबुकवरून विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. समाजमाध्यमांतून जाहिरात करत येथील घरांची विक्री करणारी एक मोठी टोळी कार्यरत असून  सात लाखांपासून १० लाख रुपयांपर्यंत ही घरे विकली जात आहेत.

डोंबिवली आणि कोपर स्थानकांदरम्यान मोठय़ा प्रमाणावर कांदळवनाचा पट्टा आहे. विविध प्रकारची निसर्गसंपदा या ठिकाणी असताना तथाकथित भूमाफियांकडून या भागातील तिवरांची कत्तल करण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गाला लागून असणाऱ्या खाडीवर भराव टाकून त्या ठिकाणी लांबलचक चाळी बांधण्यात आल्या आहेत. या चाळींना महापालिकेकडून पाण्याची जोडणी देण्यात येते तसेच विजेचा पुरवठा  मिळतो. मध्यंतरी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने येथील चाळींवर तोंडदेखले कारवाई केली. मात्र, येथील बेकायदा चाळींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.

कांदळवनातील तिवरांची नासधूस करुन त्या ठिकाणी दगड मातीचा भराव टाकला जात आहे. भराव झालेल्या जागी चाळी बांधल्या जात आहेत. या ठिकाणी उभ्या राहिलेल्या चाळींमधील घरांची विक्री तसेच भाडेपट्टा व्यवहार काही नवे नाहीत. ते पूर्वीही होत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमाद्वारे या घरांच्या विक्रीसाठी जोरदार साखळी उभी केली जात असल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे. फेसबुकवर ‘आम्ही डोंबिवलीकर’ अशा नावाचे पेज तयार करून चाळीतील नमुना खोल्यांचे फोटो टाकण्यात येतात. त्यानंतर त्याखाली खोलीची किंमत आणि एकूण क्षेत्रफळ लिहिण्यात येते. तसेच संपर्क क्रमांक देण्यात येतो. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता तो चाळीतील खोल्या अधिकृत असल्याचे सांगतो. तसेच तुमच्या मर्जीने टप्प्याटप्पाने पैसे देऊ शकता असेही ग्राहकास सांगण्यात येते. खोली खरेदी करताना रोखीने पूर्ण पैसे देणार असल्यास खोलीच्या मूळ किमतीपेक्षा अर्धी किंमत करण्यात येईल मात्र कर्ज सुविधा उपलब्ध नाही, असेही संबंधित व्यक्तीकडून सांगण्यात येते. तसेच चाळीची जाहिरातीबाजी करणाऱ्याकडून ग्राहकाच्या मोबाइलवर खोल्यांचे फोटो आणि इतर माहिती पाठवण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या खोल्या अनधिकृत असून खोली विकत घेणाऱ्या नागरिकांची मोठी फसवणूक चाळीच्या मालकांकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अल्पवयीन मुलांचा वापर

फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांचा वापर ज्या मुलांना अधिक चांगल्या प्रकारे येतो, अशा तरुणांच्या मदतीने भूमाफियांनी ही ‘सोशल’विक्री सुरू केली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचेही दिसून येते. आकर्षक रंगरंगोटी करून नमुना खोल्यांची छायाचित्रे फेसबुकवर टाकून ग्राहकांचे लक्ष आकर्षित करण्यात हे तरुण वाकबगार बनले आहेत.

डोंबिवली कोपर रेल्वे स्थानक दरम्यानच्या भागात कांदळवनाच्या जागी अनधिकृत चाळी बांधण्यात येत आहेत. काही महिन्यांपासून या चाळी बांधण्याच्या संख्ये मध्ये वाढत होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यानुसार इतर अधिकाऱ्यांसह दोन तीन दिवसात आम्ही त्या ठिकाणी जाऊन संबंधितांवर कारवाई करणार आहोत.   -परशुराम कुमावत (जी-वार्ड अधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिका)

फेसबुक तसेच व्हॉटसअ‍ॅपवर येणाऱ्या फसव्या संदेशांपासून समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहायला हवे. एखाद्या नागरिकाच्या फेसबुक किंवा व्हॉटस् अ‍ॅपवर चाळींच्या विक्रीसंदर्भात येणाऱ्या संदेशाची कायद्याच्या आधारे शहानिशा करायला हवी आणि त्यानंतरच पुढचे पाऊल टाकावे. अमिषाला बळी पडून समाजमाध्यमांवरील गोष्टींना खरे मानू नये.   –डॉ. संदीप भाजीभाकरे, ठाणे सायबर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त

अनधिकृत चाळीमधील खोल्यांचे दर (रोखीने पैसे दिल्यास अर्धी किंमत)

  • २०० चौरस फूट ७ लाख रु.
  • ३५० चौरस फूट ८ लाख रु.
  • ४८५ चौरस फूट १० लाख रु.