News Flash

डोंबिवलीत पुन्हा बेकायदा चाळींचा सुळसुळाट

तरीही या बेकायदा बांधकामांवर ‘ग' प्रभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही

आयरे, कोपर परिसरात वाढते प्रस्थ; पालिका कर्मचारी निवडणुकीत व्यस्त असल्याचा गैरफायदा

महापालिकेच्या डोंबिवलीतील ‘ग’ प्रभागाच्या अंतर्गत असणाऱ्या आयरे, कोपर भागात गेल्या तीन महिन्यांच्या काळात तब्बल २३० बेकायदा चाळींची बांधकामे उभी राहिल्याची धक्कादायक बाब पालिकेच्या कागदपत्रांवरून उघडकीस आली आहे. काही ठिकाणी खाडीकिनारा बुजवून या चाळी उभारण्यात येत आहेत, असे पालिकेचे सव्‍‌र्हेअर रमेश चव्हाण यांनी प्रशासनाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
तसेच, सुनीलनगर भागात पाण्याच्या टाकीजवळ दोन माळ्याची बेकायदा इमारत उभी राहिली आहे. आशापुरा इमारतीच्या बाजूला दोन माळ्यांचा बेकायदा बंगला उभारण्यात आला आहे. यासंदर्भात या भागातील एका जागरूक नागरिकाने पालिकेच्या ‘ग’ प्रभागाकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही या बेकायदा बांधकामांवर ‘ग’ प्रभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे तक्रारदाराने सांगितले.
डोंबिवली पूर्व भागात म्हात्रे टॉवर येथे राहणारे सुभाषचंद्र बोराडे, कोपरगाव येथील कबीर पाटील यांनी ‘ग’ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी मधुकर शिंदे यांच्याकडे आयरे, कोपर भागात मोठय़ा संख्येने चाळी, गाळे बांधण्यात येत असल्याच्या तक्रारी गेल्या तीन महिन्यांपूर्वी केल्या होत्या. पालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कर्मचारी निवडणुकीत व्यस्त झाले. त्याचा पुरेपूर लाभ भूमाफियांनी उठवून बेसुमार बेकायदा चाळी या भागात बांधल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन पालिकेचे सव्‍‌र्हेअर रमेश चव्हाण यांनी आयरे भागातील गणपती विसर्जन तलाव, आयरे स्मशानभूमी, खाडी हद्द, आयरे नाला भागातील बेकायदा चाळींचे सर्वेक्षण केले. या ठिकाणी २३० बेकायदा चाळींची उभारणी करण्यासाठी जोते, काही ठिकाणी चाळी, गाळे उभारण्यात आल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले.
या सर्वेक्षणानुसार ‘ग’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी मधुकर शिंदे यांनी या बेकायदा चाळी भूमाफिया राहुल तेलकर (पाटील), प्रफुल्ल गोरे, राजेश चव्हाण, संदीप गोळांबे, सुरेश भोईर, पंकज पाटील, भास्कर जोशी, मनीष टकले, कैलास केणे, अशोक पवार, जगदीश पाटील, रवी भोईर, जितू म्हात्रे यांनी उभारल्या असल्याचे पाहणी अहवालात म्हटले आहे. तीन महिने उलटूनही ‘ग’ प्रभागाने या बेकायदा बांधकामांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात येते.

बांधकामे तोडल्याचा देखावा
‘ग’ प्रभागाने गुरुवारी आयरे, कोपर भागातील जोते, काही चाळी तोडल्याचा देखावा उभा केला. आयुक्त ई. रवींद्रन यांना दाखवण्यासाठी जुजबी बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे, असे तक्रारदारांनी सांगितले. ज्या बांधकाम मालकांशी पालिका अधिकाऱ्यांचे हितसंबंध आहेत. अशा बेकायदा बांधकामांना अधिकाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. बेकायदा बांधकामे, कारवाईची टांगती तलवार यामुळे अस्वस्थ असलेल्या प्रभाग अधिकारी मधुकर शिंदे यांच्याकडून ‘ग’ प्रभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत.

आयरे, कोपर भागातून बेकायदा चाळींबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशांपैकी सुमारे १२ जोते, ३२ खोल्यांची बेकायदा बांधकामे अलीकडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तक्रारी प्राप्त झालेली सर्व बेकायदा बांधकामे तोडण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने ही कारवाई करण्यात येत आहे.
– मधुकर शिंदे
ग, प्रभाग अधिकारी, डोंबिवली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2015 2:46 am

Web Title: illegal construction in dombivli
टॅग : Dombivli
Next Stories
1 खडकपाडय़ातील भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेनेची तक्रार
2 बेकायदा बांधकामे तोडण्याचे आयुक्तांचे प्रशासनला आदेश
3 डॉ. आमटे दाम्पत्याच्या नागरी सत्काराचे आयोजन
Just Now!
X