भगवान मंडलिक

कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील रहिवासी पुराच्या पाण्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे भूमाफिया, पाणीचोर मात्र जलमय परिस्थितीची चिंता न करता बिनधास्तपणे बेकायदा चाळी, गाळे यांची उभारणी आणि पाणीचोरी करण्यात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे.

पालिका अधिकारी पूर परिस्थिती हाताळणे, बैठकांमध्ये व्यग्र असल्याचा गैरफायदा भूमाफियांनी उचलला आहे. कल्याण, डोंबिवली शहरांच्या चारही बाजूने भूमाफियांनी नाले, खाडी, गटारे, ओढे बुजवून बेकायदा चाळी, गाळे, इमारती बांधल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका खाडीकिनारा भागातील रहिवाशांना पुराच्या माध्यमातून बसला. मात्र याचे काहीही सोयरसूतक भूमाफियांना नाही. अजूनही खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू आहेत.

बांधकामे पूर्ण झाली की तात्काळ पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून रात्रीतून चोरीची जलवाहिनी घेऊन बेकायदा चाळीला पाणीपुरवठा सुरू केला जातो. मुख्य जल वाहिनीवरून पाणी घेणे नियमबह्य़ असताना भूमाफिया पाणी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकार करत असल्याचे कळते. अनेक वेळा पाणी अधिकाऱ्यांना हे प्रकार माहिती नसतात. या बेकायदा बांधकामासाठी चोरीची वाळू मुबलक प्रमाणात तस्करांकडून उपलब्ध होऊ लागली आहे. शहराच्या विविध भागांत ही बेकायदा बांधकामे सुरू आहेत.

आरक्षित भूखंडांजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी भूखंड हडप होत असल्याच्या तक्रारी पालिका, शासनाकडे केल्या आहेत तरीही पालिकेकडून कारवाई केली जात नाही. पालिका अधिकाऱ्याने मात्र बेकायदा बांधकामांच्या जशा तक्रारी येतात, त्याप्रमाणे तात्काळ कारवाई केली जाते. प्रशासन बेकायदा बांधकामांची पाठराखण करीत नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

तक्रारींचा पाऊस 

डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौकात आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर बसवून, कोणतेही सामासिक अंतर इमारतींच्या बाजूला न ठेवता हे बेकायदा बांधकाम केले जात आहे. आजुबाजूच्या रहिवाशांनी यासंदर्भात आवाज केला तर त्यांना गप्प बसविण्यात आले. यासंदर्भात एका जागरूकाने आयुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे या बेकायदा बांधकामाची तक्रार केली आहे. २७ गावांतील भाल, दावडी भागात बेसुमार बांधकामे सुरू आहेत.