महापालिका संघटित गुन्हेगारी कलमाखाली गुन्हे दाखल करणार

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पुढे करत गावांच्या वेशीवर बिनधोकपणे बेकायदा बांधकामे उभी करण्याचा धंदा अजूनही राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र ठसठशीतपणे पुढे आले असून ऐरोली उपनगरालगत असलेल्या तळवली, गोठिवली गावांमध्ये सिडकोच्या मोकळ्या जमिनीवर चार ते पाच मजल्यांचे बेकायदेशीर इमले उभारले जात असल्याचे चित्र खुद्द महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका दौऱ्या दरम्यान उघड झाले. जेमतेम एखाद दुसरी व्यक्ती शिरू शकेल अशा चिंचोळ्या गल्ल्यांमधून रेती, सिमेंटच्या गोण्या वाहून नेत या इमारतींचे बांधकाम सुरू होते. हे चित्र पाहून मुंढेही अवाक झाले. त्यानंतर त्यांनी लागलीच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून या बांधकामांमागे प्रकल्पग्रस्त आणि गरिबांची नावे घेत काही माफियांच्या संघटित टोळ्या कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नवी मुंबई गावांलगत असलेल्या मोकळ्या जमिनी बळकावून त्यावर कोणत्याही प्रशासकीय परवानगीविना बेकायदा इमले उभारण्याचा धडाका गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. स्वतला विकास आयुक्त म्हणवून घेत आणि राजकीय नेत्यांच्या भूमिकेत शिरलेल्या काही माजी आयुक्तांच्या काळात तर फिफ्टी फिफ्टी पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या या इमारतींचा काळा धंदा भलताच तेजीत असल्याचे चित्र होते. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा मुद्दा पुढे करत भूमाफियांनी उभारलेल्या या इमारतींनाही संरक्षण मिळावे असे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून येथील ठरावीक राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत. मध्यंतरी अशा काही बांधकामांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कारवाई सुरू केल्याने संतापलेल्या राजकीय व्यवस्थेने थेट नवी मुंबई बंदचे हत्यार उगारले होते.

तेव्हाही प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या गरजेपोटी घरांचा मुद्दा पुढे आणला गेला असला तरी ३०-४० मीटरच्या भुखंडावर उभ्या राहात असलेल्या पाच-पाच मजली बेकायदा इमारतींविषयी मात्र ही मंडळी ब्रदेखील उच्चारत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी सकाळी आपल्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमासाठी घणसोली भागात आलेले तुकाराम मुंढे यांनी अचानक लगतच असलेल्या गोठिवली आणि तळवली गावांना भेटी दिल्या. या गावांमध्ये राजरोसपणे सिडकोच्या मोकळ्या जमिनी बळकावून बांधकामे उभी केली जात असल्याचे पाहून स्वत मुंढेही अवाक झाले. मुंढे गावात आले आहेत, हे कळताच या इमारती उभ्या करणारे माफिया आणि तेथील मजुरांनी बांधकाम स्थळावरून धूम ठोकली.

कारवाई तीव्र होणार

बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली जाईल, अशी घोषणा तुकाराम मुंढे यांनी केली आहे. अशा पद्धतीने परवानगी न घेता उभी केली जात असलेली बांधकामे पाहून परिस्थिती भयावह झाल्याचे जाणवत आहे, अशी कबुली यावेळी मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गरीब आणि प्रकल्पग्रस्तांची नावे घेऊन बेकायदा बांधकामे उभारण्याचा काळा धंदा येथे सुरू असून हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचा दावाही मुंढे यांनी यावेळी केला. ही बांधकामे उभी करत असताना केवळ बिल्डर नव्हे तर त्यामागे कुणीही असेल तर त्यांचा शोध घेऊन संबंधितांवर संघटित गुन्हेगारीच्या कलमाखाली गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. हे माफियाराज खणून काढण्याशिवाय आता पर्याय नसून असे केले नाही तर भविष्यात मोठय़ा दुर्घटनेला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. वारंवार सूचना देऊनही अशी बांधकामे उभी राहात असतील तर गुन्हेगारीचा हा कणा मोडून काढावाच लागेल, असेही ते म्हणाले.