|| भगवान मंडलिक निबंधकांना दस्तऐवजांमधील सत्यता तपासणीचे अधिकार नसल्याचे स्पष्ट कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून बेकायदा बांधकामांच्या याद्या प्रसिद्ध होऊ लागताच, चवताळलेल्या भूमाफियांनी बनावट कागदपत्र, खोटय़ा सरकारी, पालिका शिक्क्यांचा आधार घेऊन बेकायदा बांधकामांमधील सदनिकांची विक्री सुरू केली आहे. या सदनिकांच्या विक्री व्यवहारासाठी डोंबिवलीतील गांधीनगर मधील सहदुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर दलाल, भूमाफिया यांची झुंबड उडाली आहे. एक महिला दलाल हे सगळे व्यवहार करून देण्यासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे. आठवडाभरापासून भूमाफियांनी दलालांच्या साह्यने अनेक सदनिका खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडले असल्याची चर्चा आहे. या सर्व सदनिका खरेदी विक्री व्यवहारांची महसूल विभाग, जिल्हाधिकारी, मुद्रांक महानिरीक्षकांनी चौकशी केली तर मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डोंबिवली परिसरातील भोपर, नांदिवली पंचानंद, सागाव, देसलेपाडा किंवा पश्चिमेतील देवीचापाडा, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा, नवापाडा भागांतील बेकायदा इमारती, चाळीत १० ते १५ लाखांना मुंबईतून आलेले रहिवासी घर खरेदी करीत आहे. या खरेदीदारांना भूमाफियांकडून बोगस सातबारा उतारा, बनावट अकृषीक परवानग्या, पालिकेच्या बनावट परवानग्या आणि खोटे सही शिक्के वापरलेले सरकारी कागद दाखविले जातात. त्या कागदपत्रांवर विश्वास ठेऊन खरेदीदार सदनिका खरेदी करीत आहेत, अशी माहिती या खरेदी विक्रीत असलेल्या एका जाणकाराने दिली. एक सदनिका व्यवहारामागे सुमारे ५० हजार ते लाखाचा बेकायदा व्यवहार होत असल्याचे समजते. बनावट कागदपत्र उपलब्ध डोंबिवलीतील गांधीनगर मधील सह दुय्यम निबंधक कार्यालयाने (कल्याण ३) बेकायदा इमारती मधील सदनिकांचा बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री व्यवहार पूर्ण केल्याचे दोन खोटे दस्तऐवज ‘लोकसत्ता’च्या हाती लागले आहेत. या बनावट नोंदणी प्रकरणाची एका जागरूक नागरिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. सदनिकांचा खरेदी विक्री व्यवहार करताना अनेक वेळा प्रत्यक्ष जमीन मालक एक, छायाचित्रे दुसऱ्याचे, या विक्री व्यवहारांची जमिनीच्या अन्य वारसांना माहितीच नसते. त्यामुळे हे विक्री व्यवहार उघड झाले की मग जमिनींच्या वारसांमध्ये वाद निर्माण होतात. व्यवहार कायद्याच्या कचाटय़ात अडकून सदनिका खरेदीदार फसतो. गेल्या आठवडय़ात भोपर, नांदिवली पंचानंद, आजदे, मानगाव भागातील सदनिकांचे घाईने नोंदणीकरण करण्यात आल्याचे दुय्यम निबंधकांचे दस्तऐवज उपलब्ध झाले आहेत. नोंदणीकरण कार्यालयात सदनिका, जमीन खरेदी विक्री व्यवहारांसाठी जे दस्तऐवज येतात. त्यांचे नोंदणीकरण करणे हे तेथील अधिकाऱ्याचे काम आहे. नोंदणीकरणासाठी आलेला दस्तऐवज खरा की खोटा हे ठरविण्याचा अधिकार सह दुय्यम निंबधकाला नाही. -मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांची यादी पालिकेने संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. त्यामुळे बांधकामाच्या अधिकृतपणाची खात्री केल्या शिवाय कल्याण, डोंबिवली, २७ गाव पालिका हद्दीतील जमीन, सदनिका खरेदी विक्री व्यवहारांची पालिकेकडून खात्री केल्या शिवाय हे खरेदी विक्रीचे व्यवहार करू नयेत. -गोविंद बोडके, आयुक्त