वसई-विरार महापालिकेच्या साहाय्यक प्रभाग आयुक्त स्मिता भोईर यांनी पाच वर्षांत ५३५ अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याचा आरोप शिवसेना नेते धनंजय गावडे यांनी केला आहे. भोईर यांनी हे आरोप फेटाळताना बांधकाम व्यावसायिकांवर ११३ एमआरटीपीएचे गुन्हे दाखल करून तब्बल अडीच हजार बेकायदा इमारती आणि चाळी पाडल्याचे सांगितले. आजवर कुणी एवढी कारवाई केली नसल्याचाही दावा त्यांनी केला.
साहाय्यक प्रभाग आयुक्त स्मिता भोईर यांनी २०१० ते २०१५ या पाच वर्षांत विविध ६४८ अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी ११३ प्रकरणांत बिल्डरांवर एमआरटीपीएचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मग उर्वरित ५३५ बांधकामांना दिलेल्या नोटिसांचे काय झाले, असा सवाल पालिकेतील शिवसेना गटनेते आणि उपजिल्हाप्रमुख धनंजय गावडे यांनी उपस्थित केला. ती बांधकामे नियमित होती का आणि जर नसतील तर त्यांच्यावर कारवाई का नाही झाली, असा सवाल करून भोईर यांनी नोटिसा दिलेल्या सर्व बांधकामांचीे चौकशी करण्याची मागणी  केली आहे. या प्रकरणी समाधानकारक उत्तर न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले.

२००० इमारती जमीनदोस्त केल्याचा दावा
स्मिता भोईर यांनी हे आरोप फेटाळून लावताना अनधिकृत बांधकामाविरोधात आपण केलेली कारवाई विक्रमी असल्याचा दावा केला. मी गेल्या पाच वर्षांत तब्बल २ हजार २८४ इमारती, चाळी आणि दुकाने जमीनदोस्त केल्याचे त्या म्हणाल्या. त्यात ३०० हून अधिक इमारती चार मजली असल्याचेही त्या म्हणाल्या. माझ्या कारकीर्दीत ११३ बांधकाम व्यावसायिकांवर एमआरटीपीएमअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजवर कुठल्याच अधिकाऱ्याने अथवा यापूर्वीच्या सिडकोनेही एवढी कारवाई केली नव्हती, असे त्या म्हणाल्या.