24 November 2020

News Flash

शिळफाटा रस्त्याला बेकायदा बांधकामांचा विळखा

रस्त्याच्या दुतर्फा भूमाफियांकडून झोपडय़ांची उभारणी; प्रशासनाचे दुर्लक्ष

शिळफाटा रस्त्याच्या कडेला कच्चे निवारे बांधण्यात येत आहेत. या बेकायदा बांधकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा भूमाफियांकडून झोपडय़ांची उभारणी; प्रशासनाचे दुर्लक्ष

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्ता अजस्र अशा वाहनकोंडीत सापडला असताना या रस्त्याच्या दुतर्फा भूमाफियांनी झोपडय़ा उभारण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही हॉटेलचालकांनी यापूर्वीच मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे केली आहेत. असे असताना गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी विटांचे कच्चे बांधकाम करून जागा भाडय़ाने देण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. बेकायदा बांधकामांमुळे या मार्गावरील कोंडी आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

पाऊस सरताच पुढील आठ महिने शिळफाटा रस्त्यावर मोकळेपणाने व्यवसाय करता येत असल्याने भूमाफिया ऑक्टोबर महिन्यानंतर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झोपडय़ा, निवारा बांधण्यास सुरुवात करतात. सुरुवातीला या कच्च्या गाळ्यांमध्ये रिक्षा, दुचाकी वाहनदुरुस्ती, फर्निचर दुकान, कलिंगड विक्री, हेल्मेट, वाहन इंजिन वंगण विक्रीचा व्यवसाय सुरू केला जातो, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. रस्त्याच्या कडेला हे व्यवसाय सुरू करण्यात येत असल्याने वाहनचालक रस्त्यावर थांबून खरेदी करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी वाढत आहे. आतापर्यंत अवजड वाहने, खड्डे हे शिळफाटा रस्त्यावरील कोंडीची कारणे होती. शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा सुरू होणारे व्यवसाय हे वाहनकोंडीचे आणखी एक कारण ठरणार आहे. माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी पत्रीपूल ते पलावापर्यंत असणारी सर्व पक्की, कच्ची बेकायदा बांधकामे, वाहनदुरुस्ती कार्यशाळा जमीनदोस्त केल्या होत्या. त्यानंतरच्या काळात भूमाफिया, स्थानिकांनी पुन्हा शिळफाटा रस्त्याच्या कडेला बांधकामे करण्यास सुरुवात केली आहे.

शिळफाटा मुख्य रस्ता आणि सेवारस्त्याच्या मधल्या मोकळ्या भागात मातीचे भराव टाकून वीज मनोरे, झाडांचे आडोसे पाहून ही बेकायदा बांधकामे केली जात आहेत. २७ गावे ग्रामीण भागात पालिकेचे नियंत्रण उरलेले नाही. या गावांवर अद्याप प्रशासक नेमलेला नाही. एमएसआरडीसी, एमआयडीसी हद्दीत हा परिसर येतो; पण या दोन्ही व्यवस्थांचे बेकायदा बांधकामांकडे लक्ष नसल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पत्रीपूल, टाटा नाका, गोळवली, सोनरापाडा, मानपाडा, दावडी भागांत ही कामे सुरू आहेत. कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून प्रवास करताना दीड ते दोन तास खोळंबत प्रवास करावा लागत आहे. त्यात बेकायदा बांधकामांची भर पडणार असल्याने प्रवासी, वाहनचालकांची चिंता वाढली आहे.

शिळफाटा एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या कडेला बेकायदा बांधकामे सुरू असतील तर त्याची पाहणी करून ती तोडून टाकण्याची कार्यवाही केली जाईल.

– संजय ननावरे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 2:15 am

Web Title: illegal construction on shilphata road zws 70
Next Stories
1 कोविड रुग्णालयात बोगस डॉक्टर?
2 जलवाहतूक आराखडय़ातून कल्याण शहराला वगळले
3 मीरा-भाईंदरला १५५ दशलक्ष लिटर पाणी
Just Now!
X