मध्य रेल्वे मार्गावरील दिवा नावाचे उपनगर आपल्या हद्दीत मोडते याचा बहुधा ठाणे महापालिकेस विसर पडला असावा. भौगोलिकदृष्टय़ा दिवा परिसराची नाळ कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाशी जोडली गेली आहे, पण ठाणे महापालिकेत असल्याने ‘न घर का न घाट का’ अशी या उपनगराची अवस्था झाली आहे. पालिका प्रशासनांच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिक राजकारण्यांच्या पाठबळामुळे दिव्यात अनधिकृत बांधकामे फोफावत गेली, किंबहुना हे शहर म्हणजे बेकायदा बांधकामांची बजबजपुरी बनले आहे.

दरवर्षी सादर होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या बहुचर्चित अर्थसंकल्पात विकासाचा वाटा मिळावा यासाठी मुंबा, कौसा, शीळ, डायघर यांसारखी उपनगरे धडपडत असताना दूर पल्याड असलेल्या दिव्याकडे ठाण्यात मुख्यालयात बसणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांचे लक्ष जाईल ही अपेक्षा करणेच मुळी धाडसाचे. दीड-दोन दशकांपूर्वी दिव्याचा समावेश ठाणे महापालिका हद्दीत झाला, तेव्हा या नव्या उपनगराच्या विकासाचे ठोस नियोजन केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अगदी नवी मुंबईच नव्हे, पण त्या शहरातील एखाद्या उपनगराच्या धर्तीवर तरी दिव्याचे नियोजन करा, असा विचार तेव्हा काही नियोजनकर्त्यांनी बोलून दाखविला होता. ठाणे शहरापेक्षा वेगळा असा दिव्याचा स्वतंत्र विकास आराखडा असावा, नगर नियोजन असावे असे त्या वेळी अनेकांना वाटत होते, मात्र ठाणे महापालिकेच्या इतिहासातील अभूतपूर्व अशा बजबजपुरीचा तो काळ असावा. याच काळात ठाणे, कळवा, मुंब्रा यांसारख्या उपनगरांमध्ये शेकडोंच्या संख्येने बेकायदा बांधकामे उभी राहात होती. मोकळ्या जमिनी हडप करून भूमाफियांची साखळी त्यावर बेकायदा इमले उभे करत जिवाची मुंबई करत पाहात होती. ठाण्याची ही अवस्था, तर दिव्याकडून वेगळी अपेक्षा करणे धाडसाचे होते. कळवा, मुंब्य्रालाही लाजवेल अशा वेगाने या उपनगरात बेकायदा बांधकामे उभी राहिली. इंचइंच जमिनीवर दावा सांगत भूमाफियांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या सोबत या उपनगराचे अक्षरश: लचके तोडले. ठाण्याच्या जवळ दिव्यात स्वस्त आणि बेकायदा घरांच्या विक्रीचा धंदा तेजीत आला. स्वस्त घरे मिळविण्याच्या नादात हजारो कुटुंबांनी येथील बेकायदा इमल्यांमध्ये संसार थाटले आहेत. गेल्या काही वर्षांत येथील कानाकोपरा माफिया आणि बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनी गिळला आहे.

ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात दिव्यात काही सुविधांची आरक्षणे आहेत, मात्र त्यापैकी बहुतेक आरक्षणे केव्हाच बेकायदा इमल्यांनी गिळली आहेत. मोकळ्या जागा, उद्याने, मैदाने, मनोरंजनाची ठिकाणे यांसारखी दिवास्वप्नेही येथील रहिवाशांना पाहाता येणार नाही, एवढे हे उपनगर बकाल झाले आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरात विकासाचे नवेनवे आराखडे आखले जात असताना दूर तिकडे दिव्याकडे ढुंकूनही पाहायला कुणाला वेळ नाही. वर्षांतून एखादा नाला उभारला, पाण्याच्या वाहिन्या टाकल्या म्हणजे आपले इतिकर्तव्य पूर्ण झाले अशा आविर्भावात महापालिकेतील अधिकारी वावरत असतात. संजीव जयस्वाल यांच्यासारख्या खमक्या आयुक्ताने ठाणे शहराचा कायापालट करायला घेतला आहे. कळवा आणि मुंब्रा भागांतही विकासाच्या कोटय़वधी रुपयांच्या योजना आखल्या जात आहेत. बेकायदा फेरीवाले, अतिक्रमणांवर हातोडा फिरवला जात आहे. दिव्यात मात्र जयस्वाल यांचा हा करिश्मा का दिसत नाही हे कोडे अनेकांना उलगडत नाही. जयस्वालच नव्हे तर यापूर्वी महापालिकेत आयुक्तपद भूषवून गेलेल्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनीही दिव्यातील दुर्दशेकडे दुर्लक्ष केले. बेकायदा बांधकाम आणि बकालीकरणामुळे बदनामीच्या गर्तेत लोटले गेलेले मुंब्रा गेल्या काही वर्षांत कात टाकताना दिसत आहे. मात्र हिंदूूंचे मुंब्रा या नावाने हिणवल्या जाणाऱ्या दिव्यासाठी अच्छे दिन कधी येतील या प्रतीक्षेत या भागातील रहिवाशी आहेत.