१९५८ मध्ये डोंबिवली ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात येऊन डोंबिवली नगरपालिका स्थापन झाली. डोंबिवली गाव शहर संस्कृतीकडे वाटचाल करू लागले होते. नगरपालिका स्थापन होताना डोंबिवलीची लोकसंख्या सुमारे २५ ते ३० हजार होती. मुंबईत नोकरीसाठी जाणारा नोकरदार, सामान्य, मध्यमवर्ग डोंबिवलीत अधिक संख्येने होता. बहुतांशी कोकण, अन्य प्रांतातून आलेल्या या वर्गावर राष्ट्रप्रेम-भक्ती, समाजसेवा आणि संघ संस्कार होते. या वर्गाने शहरसेवा करण्यासाठी जनसंघ या पक्षाच्या माध्यमातून पालिकेत शिरकाव केला. सुशिक्षित, शिस्तप्रिय असलेला हा वर्ग वाढत्या शहराला नवीन दिशा देईल, ग्रामपंचायत काळात वाढलेली बेकायदा बांधकामे, भूछत्रासारखा उगवलेला भूमाफियांचा वर्ग, शहराचा ढासळत चाललेले नियोजन याला वेसण घालण्याचे काम नगरपालिकेतील लोकनियुक्त नगरसेवक करतील यावर लोकांचा विश्वास होता.
नगरपालिका स्थापन झाल्यामुळे विकास प्रकल्प राबवून शहराचा चेहरामोहरा बदलेल असे लोकांना वाटत होते. नगरपालिकेत नगरसेवकांचा कारभार सुरू झाला. श्रीपाद पटवारी, पं. स. अचलकर, वि. श्र. दातार हे शहरातील मान्यवर नगराध्यक्ष झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचा कारभार सुर झाला. बावीस वर्ष डोंबिवली नगरपालिकेचा कारभार सुरू होता. त्याचप्रमाणे कल्याण नगरपालिकेचाही कारभार सुरू झाला होता. तेथे जनसंघाचे भगवानराव जोशी व इतर इतरांच्या मार्गदर्शनाखाली कारभार सुरू होता. कल्याण, डोंबिवली हा पूर्वीपासून संघाचा प्रभाव क्षेत्र असलेला भाग. या भागातून यापूर्वी जनसंघ, भाजपचे खासदार, आमदार निवडून गेले आहेत.
शिस्तप्रिय वर्गांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही नगरपालिकांचा कारभार सुरू झाला होता. कल्याण शहराची रचना वाडे पध्दतीची होती. इतिहासकालीन शहर असल्याने या ठिकाणी पाणी पुरवठा, रस्ते, मैदाने होती. फक्त ही यंत्रणा सुस्थितीत करणे आवश्यक होती. ती कामे नगरपालिकेने उपलब्ध निधीप्रमाणे पार पाडली. परंतु, कळस झाला तो डोंबिवली नगरपालिकेच्या हद्दीत. ग्रामपंचायतीच्या काळात सुरू असलेली बेकायदा बांधकामे नगरपालिकेच्या काळात नवीन कायदे, नियमावलीमुळे थांबतील, अशी लोकांची अपेक्षा होती. तो निव्वळ भ्रम निघाला. नगरपालिकेने, लोकनियुक्त शासकांनी डोंबिवलीची गरज ओळखून रस्ते, वीज, पथदिवे, पाणीपुरवठा, आरोग्य, दवाखाने, स्वच्छता या अत्यावश्यक सुविधा शहरवासीयांना जरूर उपलब्ध करून दिल्या. मात्र, बेकायदा बांधकामे रोखण्यात ही यंत्रणा अपयशी ठरली. डोंबिवलीचा नेटका विकास व्हावा म्हणून शासन आदेशाप्रमाणे १९७२ मध्ये डोंबिवली शहराचा विकास आराखडा करण्याचे काम सुरू झाले.
हा आराखडा शासनाने १९७६ मध्ये मंजूर केला. नगरपालिकेने १९७७ मध्ये या आराखडय़ाची अंमलबजाणी सुरू केली. हे सर्व सुरू असतानाच
नगरपालिकेने बांधकामांसाठी १ चटई क्षेत्रावरून १.५ चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय १९७४ मध्ये घेतला. या निर्णयाला शासनाची कोणतीही मंजुरी नव्हती. बांधकामासाठी फुकटचे वाढीव चटई क्षेत्र, आरक्षणाच्या मोकळ्या जागा दिसू लागल्यावर भूखंड लाटणाऱ्या नव्या विकासकांची एक जात डोंबिवलीत जन्माला आली. या भूमाफियांनी नगरपालिका प्रशासनाची पर्वा न करता पालिकेच्या राखीव भूखंडावर बेकायदा इमले उभारण्याची कामे सुरू केली. त्याला तत्कालीन अधिकारी, लोकप्रनिधींचीही तितकीच साथ मिळाली. डोंबिवलीचा सुटलेल्या नियोजनाचा तोल वेळीच आवरणे हे तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासनाचे काम होते. परंतु, या मंडळींनी केवळ रस्त्यावरील शेणाच्या कुंटांमध्ये रॉकेल ओतून शहर उजळून ‘दिवे’ लावण्यात समाधान मानल्याची टीका त्यावेळी आणि आताही होत आहे. कल्याणपेक्षा डोंबिवली शहरात बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी शासनाकडे जागरूक नागरिकांकडून करण्यात येत होत्या. अशा तक्रारींची दखल घ्यावी असे कधी स्थानिक नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्षांना वाटले नाही. नगरपालिकेतील हा भोंगळ कारभार पाहून शासनाने डोंबिवली नगरपालिकेने विकास आराखडय़ातील तरतुदीप्रमाणे शहरात विकास कामे करावीत. विकास नियंत्रण नियमावलीचे पालन करावे असे आदेश दिले होते. नगरपालिकेने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले.
डोंबिवलीत विकास आराखडय़ाप्रमाणे रस्ते कामे सुरू करण्यात आली. या रस्त्यांना लागून इमारती, चाळी उभारण्यात येत होत्या. ही बांधकामे अधिकृत की अनधिकृत हे तपासण्याचे सौजन्य प्रशासनाने पार पाडले नाही. त्यामुळे अनेक इमारती, घरे आज विकास आराखडय़ातील
रस्त्यांच्या मध्ये, कोपऱ्यावर उभ्या आहेत. ही बांधकामे नगरपालिकेने त्या वेळीच जमीनदोस्त केली असती, तर आता निर्माण झालेले अरूंद रस्त्यांचे, त्यामुळेची वाहतूक कोंडी हे प्रश्न निर्माण झाले नसते. या भागात भाजपचे नेते रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, जगन्नाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील, काँग्रेसचे नकुल पाटील यांचा सतत वावर होता. त्यांनाही आपल्या शासनकर्त्यांना कधी सूचना कराव्या वाटल्या नाहीत.
नगरपालिकेच्या काळात जनसंघाचा झेंडा कल्याण, डोंबिवलीत फडकत होता. मात्र, शहरात बेकायदा बांधकामे हातपाय पसरवत असताना त्याला आवर घालणे जनसंघाच्या येथील नेत्यांना जमले नाही. आज हे विचारवंत जळीस्थळी आटोपशीर शहराची व्याख्याने, तत्त्वज्ञान शिकवत फिरत असतात. पण ती वेळ आधीच निघून गेली. किंबहुना आपणच ती घालवली, याचे भान या मंडळींना अद्याप आलेले नाही.