येऊरमधील मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती
मानवी हस्तक्षेपामुळे येऊर जंगलातील प्राण्यांच्या अधिवासाला एकीकडे धोका पोहचू लागला असताना याच टेकडीवर बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या काही श्वान घरांमुळे बिबटय़ांच्या नैसर्गिक वहनाला बाधा पोहचत असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. ऐन जंगलाच्या तोंडावर सुरू असलेल्या अशा श्वान घरांकडे खाद्याच्या शोधात बिबटे फिरकू लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मात्र, वन विभागाने हे श्वान गृह आपल्या हद्दीत नसल्याचे सांगून हात वर केले आहेत.
जंगल परिसरात श्वान पालनासाठी कोणत्याही परवानगीची तरतूद शासनाकडे नाही. असे असताना येऊरमध्ये राजरोसपणे श्वानपालनाचा व्यवसाय मोठय़ा स्वरूपात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. जंगलापासून काही हाकेच्या अंतरावर प्रगती अ‍ॅनिमल चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत ‘अ‍ॅक्शन डॉग सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचे श्वान घर आहे. तसेच ‘ईगल नाइन फाऊंडेशन’ आणि ‘पेट्स हॉस्टेल’ अशा नावाची काही श्वान घरे या परिसरात आहेत. या श्वान घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात श्वानांचे वास्तव्य असल्याने वासावरून आपली शिकार ओळखणारे बिबटे या परिसरात खाद्याच्या शोधात येतात. ही श्वान घरे अस्तित्वात राहिली तर भविष्यात बिबटे मानवी वस्तीत शिरतील, अशी भीती काही काही पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. ही श्वान घरे खासगी मालकी क्षेत्रात येत असल्याचे कारण पुढे करीत वनविभागाकडून हात वर केले जात आहेत. ‘खासगी मालकी क्षेत्राच्या अखत्यारीत संबंधित श्वान केंद्र येत असल्याने श्वान केंद्राच्या संदर्भातील निर्णय वनविभागाच्या माध्यमातून घेतला जाऊ शकत नाही. इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी नियमित लसीकरण श्वानांना देण्याचे पत्र श्वानमालकांना देण्यात आले आहे,’ असे वनविभागाकडून सांगण्यात आले.
या श्वानघरांसाठी वनविभागाकडून तसेच महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. या ठिकाणी काही संस्थांच्या नावे सुरू असलेल्या श्वान घरांमध्ये व्यावसायिक हेतूने बेकायदा पद्धतीने श्वानांचे प्रशिक्षण आणि प्रजनन केले जाते, अशा तक्रारी पर्यावरण संस्थांनी वन विभागाकडे नोंदविल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या एका व्यावसायिक संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या श्वानघरात १५ श्वानांना प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचे अ‍ॅनिमल वेलफेअर ऑफिसर मित आशर यांनी या ठिकाणी भेट दिली असता प्रशिक्षणासाठी, भाडेतत्त्वावर तसेच प्रजननासाठी श्वान बाळगले असल्याचे त्यांना आढळून आले. बिबटय़ांना वासावरून श्वानांचे वास्तव्य कळत असल्याने जंगलापासून काही अंतरावर या श्वानघरातील श्वान सहज बिबटय़ांचे भक्ष्य ठरू शकतात. याशिवाय श्वानांना एखादा संसर्गजन्य आजार उद्भवल्यास येऊरमधील इतर वन्यप्राण्यांवर याचा त्वरित संसर्ग होऊ शकतो. या श्वानघरांमुळे वन्यजीवांना धोका असल्याने संबंधित खासगी श्वानघरांविषयी निर्णय घेण्याचे मागणीपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांकडे पाठवण्यात आले होते. मात्र बरेच दिवस उलटूनही या संदर्भात कोणत्याही प्रकारचे उत्तर संबंधित यंत्रणेकडून आलेले नाही, असे मित आशर यांनी सांगितले.

श्वानांना हाताळण्याचे, प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करतो. श्वान प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक लोकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. अ‍ॅक्शन डॉग सव्‍‌र्हिसेस हे संपूर्णत: वैयक्तिक मालकीचे होते. या माध्यमातून श्वानांना प्रशिक्षण दिले जायचे. मात्र हा भार पेलवीत नसल्याने अ‍ॅक्शन डॉग सव्‍‌र्हिसेस ही कंपनी मागील वर्षी बंद करण्यात आली. सध्या प्रगती अ‍ॅनिमल वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत सात सहकाऱ्यांच्या मदतीने श्वान प्रशिक्षण दिले जाते. भाडे तत्त्वावर श्वानांना या ठिकाणी ठेवण्यात येते. श्वान प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी कोणत्या परवानगीची आवश्यकता आहे याची माहिती मिळाल्यास परवानगी घेण्याची तयारी आहे.
राहुल गर्ग, अ‍ॅक्शन डॉग सव्‍‌र्हिसेस, प्रगती अ‍ॅनिमल चॅरिटेबल ट्रस्ट