टिटवाळा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण

कल्याण डोंबिवली महापालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून टिटवाळा येथील आरक्षित भूखंडावर वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली जाणार आहे. मात्र, या भूखंडाच्या काही भागावर उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळी आता महाविद्यालयाच्या बांधकामासाठी अडसर ठरू लागल्या आहेत. या बेकायदा चाळी हटवल्या नाहीत, तर वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रकल्प धोक्यात येऊ शकतो.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखडय़ामध्ये टिटवाळा भागात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भूखंड आरक्षित करण्यात आला आहे. १ लाख ५३ हजार ५३४ चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड आहे. त्यावर एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र सेवा विभाग बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र दरम्यानच्या काळात या आरक्षित भूखंडावर चाळींचे अतिक्रमण झाले आहे. त्यात स्थानिक भूमाफियांचा हात आहे. आता ‘जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय’ या शासनाच्या धोरणानुसार याच भूखंडावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून या महाविद्यालयाची उभारणी केली जाणार आहे. परंतु या बांधकामात आता चाळींचे बेकायदा बांधकाम अडसर ठरू लागले आहे.

पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा राखीव भूखंड सुमारे ३५ ते ३८ एकरांचा आहे. त्याच्या काही भागावर एका खासगी जमीन मालकाचा कब्जा होता. त्या जमीन मालकाला पालिकेने ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) व अन्य मोबदला देऊन सुमारे १८ एकरचा भूखंड ताब्यात घेतला. उर्वरित भूखंडाच्या क्षेत्रावर बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आहेत. शासन नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुमारे २० ते २५ एकरांचा सलग भूखंड असणे आवश्यक असते. या भूखंडावर ६० हजार चौरस फुटांचे बांधकाम प्रस्तावित आहे. महाविद्यालयासाठी या ठिकाणी पुरेशी जागा आहे. मात्र काही भागात बेकायदा बांधकामे आहेत. ती हटवून मगच जमीन संपादनाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाने लवकरात लवकर आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून महाविद्यालय उभारणीसाठी सहकार्य करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

डॉक्टरांची कमतरता दूर होणार?

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारताना सोबत ३०० रुग्णक्षमतेच्या रुग्णालयाचीही आवश्यकता असते. कल्याण डोंबिवली पालिकेची रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर ही दोन रुग्णालये आणि एक प्रसूतिगृह आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता १०० असणार आहे. महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या एकत्रित सहकार्याने हा प्रकल्प आकाराला येणार असल्यामुळे पालिका रुग्णालयांना अलीकडे जो डॉक्टरांचा तुटवडा भासतो ती उणीव या महाविद्यालयामुळे दूर होणार आहे, असे पालिकेच्या सूत्राने सांगितले.
  • टिटवाळा येथील भूखंडावर परिचारिका प्रशिक्षण, निवास व्यवस्था, अद्ययावत प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणारे वैद्यकीय विद्यार्थी प्रशिक्षणाचा भाग म्हणून पालिका रुग्णालयांमध्ये सेवा देतील. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, प्राध्यापक महाविद्यालयात येणार आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांबरोबर रुग्णांना मिळणार आहे. विशेष दर्जाच्या ५० खाटांसाठी स्वतंत्र दालन रुग्णालयात असेल. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांनी या जागेची पाहणी करून महाविद्यालय उभारणीस हिरवा कंदील दाखवला आहे, असे सूत्राने सांगितले.

आपल्याच शहरात शिक्षण

जिल्ह्य़ात कल्याण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी, शहापूर पट्टय़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी अन्य शहरात जावे लागते. विद्यार्थ्यांना आपल्याच भागात वैद्यकीय शिक्षण मिळावे या विचारातून टिटवाळा येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा निर्णय घेतला आहे, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

टिटवाळा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जागेचे भूसंपादन करण्याचे आदेश शासनाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासन व कल्याण डोंबिवली पालिका कागदपत्रांची पूर्तता करतील. त्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालय उभारणीच्या कामाला प्रारंभ होईल. यानिमित्ताने पालिका रुग्णालयांना मुबलक डॉक्टर उपलब्ध होतील. त्याचा लाभ रुग्णांना घेता येईल.

रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण

वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठीच्या भूखंडावरील ११ एकर जागा मोकळी आहे. २००९ व त्यानंतर जमीन मालकांनी या ठिकाणी चाळी बांधल्या आहेत. तीन जमीन मालक या भूखंडाशी संबंधित आहेत. गेल्या वर्षी पालिकेने या भूखंडावरील ८५० रहिवाशांना भूसंपादनाबाबत नोटिसा दिल्या आहेत. भूसंपादनाची पुढील प्रक्रिया सध्या नगररचना विभागाच्या भूसंपादन विभागाकडून सुरू आहे.

सुनील पाटील, प्रभाग अधिकरी, मांडा-टिटवाळा