ठाणे येथील पोखरण रोड भागातील महापालिकेच्या भूखंडावर बेकायदेशीर प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलधारकाकडून संबंधित आयोजक एक हजार रुपये भाडे घेत आहे. महापालिकेचा महसूल बुडवून स्वत:ची कमाई करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यासाठी मात्र स्थावर मालमत्ता विभाग आणि वर्तकनगर प्रभाग समितीचे अधिकारी एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याचे चित्र मंगळवारच्या स्थायी समितीत दिसून आले. या प्रकरणी संबंधित आयोजकांकडून दंडासहित रक्कम वसूल करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, यासंबंधी महापालिका प्रशासन ठोस उत्तर देऊ शकलेले नाही. यामुळे सदस्यांनी थेट महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
ठाण्यातील पोखरण रोड भागातील लोक हॉस्पिटलसमोर महापालिकेचा भूखंड असून तिथे हातमाग, सिल्क कपडे आणि इतर वस्तूंचे प्रदर्शन भरले आहे. येत्या १५ मार्चपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनातील स्टॉलधारकांकडून आयोजक प्रत्येकी एक हजार रुपये भाडे घेत आहेत. या प्रदर्शनास महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा मुद्दा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. तसेच महापालिकेच्या जागेवर हजारो रुपयांची कमाई करणाऱ्या आयोजकांवर कारवाई का करण्यात येत नाही आणि कारवाई करण्याचे काम स्थावर मालमत्ता विभागाचे असल्याचे वर्तकनगर प्रभाग समितीचे अधिकारी सांगतात, असाही मुद्दा त्यांनी मांडला. दरम्यान, या प्रदर्शनास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याची कबुली देत या प्रकरणी कारवाई करण्याचे काम वर्तकनगर प्रभाग समितीचे असल्याचे स्थावर मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या बैठकीला वर्तकनगर प्रभाग समितीचे अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे कारवाईचे नेमके अधिकार कुणाचे, याविषयी ठोस उत्तर सदस्यांना मिळू शकले नाही. या दोन्ही विभागामार्फत सुरू असलेल्या टोलवाटोलवीमुळे सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर थेट नाराजी व्यक्त केली.