News Flash

जीव धोक्यात घालून बेकायदा मासेमारी

पावसाळ्यात सागरी किनारा सुरक्षा पथकाच्या बोटी देखील बंद असल्याने या मच्छीमार बोटींना रोखणे शक्य होत नाही.

मासेमारी १ जूनपासून बंद असतानाही वसईतील अनेक मच्छीमारी बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरल्या आहेत. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिलेला असतानाही हे मच्छीमार बेकायदा जीव धोक्यात घालून मासेमारी करत आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला चक्रीवादळाची शक्यता जाणवत असल्याने मासेमारी पूर्णत: बंद करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. तर सर्वत्र मासेमारी बंद असून बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत. परंतु वसईतील अनेक मच्छीमार हे थोडय़ाशा पैशांसाठी अजूनही पाण्यात उतरत आहेत. पावसाळ्यात पाण्यात उंच उंच लाटांमुळे होडीवर ताबा मिळवता येत नाही तर अनेकदा होडी वाहून जाते. खाडीमधील मासेमारी (बिगर यांत्रिक)  सुरू असली तरी त्या ठिकाणी मासे मिळाले नाहीत तर मासेमार खोलवर जाण्याचा प्रयत्न करतात. खाडीच्या अर्धा कि.मी. पुढे गेल्यानंतर परत येणे शक्य होत नाही. काही मासेमार हे माशांच्या शोधात खोलवर जातात आणि जीव धोक्यात घालत असतात.

पावसाळ्यात सागरी किनारा सुरक्षा पथकाच्या बोटी देखील बंद असल्याने या मच्छीमार बोटींना रोखणे शक्य होत नाही. मच्छीमार सोसायटी या मासेमारांवर कारवाई करतात,  कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. तसेच त्या बोटीचा विमा देखील रद्द केला जातो, जर त्या बोटीवर २५ लाखांचा विमा असेल तर तो मासेमारांना मिळत नाही. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. मच्छीमारांनी बंदी काळात समुद्रात मासेमारीसाठी जाऊ  नये यासाठी मच्छीमार सोसायटय़ा आणि सागरी किनारारक्षक प्रयत्नशील आहेत.

बोटी खोल समुद्रात गेल्यानंतर त्यांना नौदलाची बोट वाचवू शकते, मात्र एन वेळेला ती उपस्थित नसेल तर मासेमार परत येण्याची शक्यता नसते. अर्नाळा समुद्र अतिशय धोकाधायक असल्याने मासेमारांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीही मच्छीमार पाण्यात उतरत असल्याने त्यांच्या जिवाला धोका  आहे.

यंत्रणेशिवाय मासेमारी सुरू आहे ती बंद झालेली नाही, पण जर मच्छीमार समुद्रात जात असतील तर तो गुन्हा आहे. काही बोटी लांबच्या दौऱ्यावर गेलेल्या असतात, त्यांना परतण्यास वेळ लागतो, म्हणून मासेमारी बंद झाल्यानंतर ते समुद्रात सापडतात.   – संजय कोळी, अध्यक्ष, मासेमार समिती

शेवटी ते मच्छीमार आहेत त्यांना त्यांचा व्यावसाय आहे, त्यामुळे त्यांना अगदी पूर्णपणे थांबवणे शक्य होत नाही. पण जर त्यांना पकडले तर नियम तोडल्याचा गुन्हा नोंदवला जातो.  –  विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक

सरकारने हे नियम त्यांच्या चांगल्यासाठी बनवलेले आहेत, तरीही दरवर्षी अनेक मच्छीमार हे नियम तोडतात आणि आपला जीव गमावतात. पावसाळ्यात वादळ असले की गस्त देखील बंद असल्याने त्यांच्या सुरक्षेची खात्री नसते.     – रवींद्र पाटील, सागरी सुरक्षा अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 1:11 am

Web Title: illegal fishing
Next Stories
1 वायुप्रदूषणामुळे बालकांना दमा?
2 जंक फूड, शीतपेयांची माकडांनाही चटक
3 विटावा रेल्वे पुलाखालचा रस्ता आजपासून खुला
Just Now!
X