ठाणे, कल्याण, भिवंडीतील शेकडो फलक हटवले

ठाणे : ठाणे लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ठाणे शहराच्या नाक्यानाक्यांवर झळणारे ३५० फलक उतरविले आहेत. भिवंडी आणि कल्याणमध्येही शेकडो फलक हटवण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी मोठय़ा प्रमाणात फलकबाजी केली होती. त्यामुळे शहर विद्रूप झाले होते.

मंगळवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात ४२९ बॅनर, ३०३ पोस्टर, ४७ होर्डिग आणि १४० झेंडे तर कल्याण लोकसभा मतदारसंघात ४१९ बॅनर, २९४ पोस्टर, ३१ होर्डिग आणि २३९ झेंडे काढण्यात आले. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा फलकमुक्त झाल्याचे चित्र आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वेगवेगळ्या भागांत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच इच्छुकांनी जोरदार फलकबाजी सुरू केली होती. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे एक नेते यामध्ये आघाडीवर होते. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपमध्ये युती झाल्यानंतर या नेत्याने गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजी आवरती घेतली आहे. तरीही वेगवेगळ्या विकासकामांचे श्रेय घेण्यावरून सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळत होती. सण, उत्सव तसेच पक्षाचे मेळावे आणि सभा अशा कार्यक्रमांच्या माध्यमांतून इच्छुक उमेदवार जागोजागी फलकबाजी करत होते.

स्वत:च्या वाढदिवसाचे फलकही जागोजागी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता. वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचेही फलक शहरभर लावले जात होते. अनेक फलक बेकायदा असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होत्या.

सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी फलकबाजी सुरू केल्यामुळे शहर विद्रूप झाले होते. ठाणे महापालिकेनेही या बेकायदा फलकबाजीकडे दुर्लक्ष केले होते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे या बेकायदा फलकबाजीला लगाम लागला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागांत लावलेले राजकीय पक्षांचे फलक काढले आहेत. आतापर्यंत ३५० फलक उतरविण्यात आले आहेत. नऊ प्रभाग समित्यांमधील पथकांनी ही कारवाई केली.

‘आचारसंहितेचे पालन करा’

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी सोमवारी सर्वच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी  ११, १८ , २३ व २९ एप्रिल अशा ४ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. मतमोजणी पूर्ण होऊन निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. तिचे पालिका क्षेत्रात काटेकोर पालन करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त अहिवर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शहरात लावण्यात आलेले सर्व राजकीय स्वरूपाचे फलक काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.