विदेशी दारूची चौपट दराने विक्री; गावठी दारूचीही निर्मिती जोरात

वसई : टाळेबंदीत मद्य्विक्रीला बंदी असतानाही काही ठिकाणी छुप्या मार्गाने देशी—विदेशी मद्याची अवाच्या सवा दराने विक्री सुरू आहे.

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर टाळेबंदी आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्व दुकाने बंद आहेत. त्यात मद्य्विक्री करणाऱ्या दुकानांचाही समावेश आहे. टाळेबंदी असतानाही दारूच्या शोधात काही जण असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. यासाठी वाट्टेल ती किंमत मोजली जात आहे. हातभट्टीचा धंदाही तेजीत सुरू असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. २१ दिवसांच्या टाळेबंदीचा मंगळवारचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर टाळेबंदी संपणार या कल्पनेनेच तळीरामांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढल्याने या सर्वाचीच गोची झाली आहे. सगळीकडे देशी, विदेशी दारूची विक्री करणारी दुकाने बंद असल्याने तळीराम हतबल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस कितीही लक्ष ठेवून असले तरी त्यांचा डोळा चुकवून सध्या वसईत काही ठिकाणी दमण, गोवा बनावटीची दारू मोठय़ा प्रमाणात विकली जात आहे. ही दारू चौपट किमतीने विकली जात असल्याने तळीराम मेटाकुटीला आले आहेत. ७०० ते १००० रुपयांच्या किमतीत मिळणारी  दारूची बाटली अडीच ते तीन हजार रुपयांच्या पुढेच विकली जात आहे. तर वाइनशॉपमध्ये तीन हजारांना मिळणारी विदेशी व्हिस्कीची बाटली १२ हजार रुपयांना विकली जात आहे. आधीच हाताला काम नसल्याने तळीराम महागडी दारू पिऊ  शकत नाहीत. त्यामुळे तळीरामांपैकी काही जण गावठी दारूकडे वळल्याचे दिसत आहे. मात्र अचानक गावठी दारूलाही मागणी वाढल्याने  विक्रेत्यांनी दारूचे भाव वाढवले आहेत. या परिस्थितीत बेकायदा दारू वाहतुकीला रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर निर्माण झाले आहे.