प्रेमीयुगुलांची छायाचित्रे काढून ओळखपत्र जप्त; पोलीस, पुरातत्त्व खाते अनभिज्ञ

वसई किल्ल्यातील प्रेमीयुगुलांविरोधात तसेच गैरकृत करणाऱ्यांविरोधात ‘किल्ले वसई मोहीम’ या संस्थेने कारवाईची मोहीम उघडली आहे. जोडप्यांना किल्ल्यातून हुसकावले जात आहेत. त्यांची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे काढून ओळखपत्रेही तपासली जात आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई करताना पोलिसांची मदत घेतली जात नसून पुरातत्त्व खात्यानेही अशा कारवाईला परवानगी दिलेली नाही. जोडप्यांची ओळखपत्रे घेऊन संबंधित महाविद्यालयात तक्रार केली जात असल्याने तरुणाई संतप्त झाली आहे. ही कारवाई बेकायदा असल्याचे पुरातत्त्व खाते आणि पोलिसांनी म्हटले आहे.

ऐतिहासिक आणि वसईचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या वसई किल्ल्यात गेल्या काही दिवसांपासून ‘किल्ले वसई मोहीम’ या संस्थेने जोडप्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. सकाळी पाचपासून रात्रीपर्यंत संस्थेचे कार्यकर्ते किल्ल्यात फिरून किल्ल्यातील जोडप्यांना हुसकावून लावत आहेत. मागील काही दिवसांत संस्थेने ३०० हून अधिक जोडप्यांवर कारवाई केली. या वेळी संस्थेची कार्यकर्ते जोडप्यांकडे महाविद्यालयाची ओळखपत्रांची मागणी करतात. ओळखपत्रे आणि जोडप्यांची छायाचित्रे काढून ती महाविद्यालयाला कळवली जात आहेत. कारवाई करताना मोबाइल कॅमेरा सुरू ठेवून जोडपी ज्या अवस्थेत आहेत, त्या अवस्थेतच त्यांची छायाचित्रे काढली जातात. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत अश्लील चाळे करताना ४५ जोडप्यांना पकडण्यात आले. २५० जोडप्यांच्या ओळखपत्रांची छायाचित्रे घेण्यात आली. १४० जोडप्यांकडे ओळखपत्रे नव्हती. परिसरातील १६ महाविद्यालयांतील हे तरुण-तरुणी होते. ओळखपत्राआधारे या तरुणांच्या महाविद्यालयांत जाऊन त्यासंदर्भातील माहिती देण्यात येत आहे. मात्र या कारवाईच्या वेळी पोलीस आणि पुरातत्त्व खात्याचे कुठलेच अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने किल्ले वसई मोहीम ही संस्था ‘मॉरल पोलिसिंग’ करत असल्याचा आरोप तरुणाईकडून होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस अवैध दारूच्या कारवाईत व्यग्र आहेत. किल्ल्यात अशी मोहीम आहे हे आम्हाला माहीत नाही, असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.

ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य राहावे म्हणून आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेपूर्वी आम्ही त्याबाबत पुरातत्त्व खात्याला लेखी कळवले आहे. पुरावे राहावे म्हणून आम्ही छायाचित्रे काढतो. मुले खोटे बोलतात म्हणून त्यांच्या ओळखपत्रांची छायाचित्रे काढून संबंधित महाविद्यलयाला कळवतो.

श्रीदत्त राऊत, अध्यक्ष, किल्ले वसई मोहीम

जोडप्यांवर कारवाई करण्याचे अधिकार किल्ल्यातील पुरातत्त्व खात्याचे आहेत. कुठल्याही खासगी संस्थेला हे अधिकार नाहीत. किल्ल्यात जाण्याला कुणालाच बंदी नाही. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात येतील.

विश्वास वळवी, पोलीस उपअधीक्षक, वसई

हा प्रकार चुकीचा आहे. आम्ही शाळकरी मुलींचे प्रबोधन करतो. मात्र कुणाच्या खासगी आयुष्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही.

मिलिंद पोंक्षे, समन्वय, जाणीव संस्था

आमचा या कारवाईशी संबंध नाही. या संस्थेला आम्ही कुठलीही परवागनी दिलेली नाही. आमचे सुरक्षा रक्षक हे काम नियमित करत असतात. किल्ल्यात येणाऱ्या कुणाचेही ओळखपत्रे विचारले जाऊ शकत नाहीत आणि त्यांची छायाचित्रे काढण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यामुळे ही मोहीम चुकीची आणि बेकायदा आहे.

कैलास शिंदे, संवर्धन साहाय्यक, वसई किल्ला

आमचे विद्यार्थी सज्ञान असतील आणि महाविद्यालयाच्या वेळेनंतर ते संमतीने कुठे फिरायला जात असतील तर आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. कुणी गैरप्रकार करत असेल तर पोलीस त्यावर कारवाई करतील. अन्य कुठल्याही सामाजिक संस्थेला अथवा व्यक्तीला नियमाबाहेर जाऊन कारवाई करण्याचा अधिकार नाही.

प्रा. विनोद गायकवाड, प्राचार्य, सेंट पीटर महाविद्यालय