रेल्वे बोर्ड सदस्यांच्या सूचनेनंतरही बदलापुरात परिस्थिती जैसे थे

बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रश्न आणि प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी डिसेंबर महिन्यात स्थानकात भेट देऊ न विविध मुद्दय़ांवरून स्थानक प्रशासनाची खरडपट्टी काढली होती. या घटनेला महिना उलटूनही स्थानकातील अनेक समस्या जैसे थे असून स्थानक परिसरातील बेकायदा पार्किंगही सुरू असल्याचे समोर आले आहे.

एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर विविध रेल्वे स्थानकातील समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी स्थानकांची पाहणी केली होती. त्यात बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या तीनसदस्यीय समितीने डिसेंबर महिन्यात हजेरी लावली होती. या वेळी प्राथमिक सोयीसुविधा, स्थानक परिसरातील स्वच्छता, जाहिराती, पादचारी पूल, स्थानक परिसरातील अस्वच्छता, बेकायदा पार्किंग अशा विविध मुद्दय़ांवरून बोर्डाच्या सदस्यांनी स्थानक प्रशासन आणि रेल्वे पोलिसांचे कान पिळले होते. स्थानकाच्या पूर्वेत असलेल्या रेल्वेच्या जागेत बेकायदा पद्धतीने दुचाकी पार्किंग होत असल्याची बाब या वेळी समोर आली होती. तसेच या ठिकाणी रेल्वेचे साहित्य बेवारसपणे पडल्याचेही दिसले होते. त्यावर बोट ठेवत बोर्डाच्या सदस्यांनी रेल्वे पोलिसांना धारेवर धरले होते. रेल्वे पोलीस अपघाताला आमंत्रण देत आहेत, असा आरोपही या वेळी सदस्यांनी केला होता. त्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत, असा सज्जड दम सदस्यांनी दिला होता. त्यामुळे यावर कारवाई केली जाईल अशी आशा होती. मात्र त्यानंतरही स्थानकाच्या शेजारील परिसरातील स्वच्छता, बेकायदा पार्किंगही जशास तसेच असल्याचे समोर आले आहे. आजही पहाटेच्या वेळी अनेक चाकरमानी येथे आपल्या दुचाकी पार्क करून जात असतात, तर रेल्वेच्या जागेतील कचराही तसाच आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड सदस्यांच्या सल्ल्यालाही रेल्वे पोलीस आणि स्थानक प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.

१५० मीटरच्या नियमालाही हरताळ

न्यायालयाच्या आदेशान्वये स्थानक परिसरापासून १५० मीटरच्या आत कोणतेही अडथळे असू नयेत. मात्र स्थानक परिसरातील रस्त्यावर पार्क केल्या गेलेल्या या वाहनांमुळे या नियमाला हरताळ फासला जातो आहे. स्थानकाच्या कर्जत दिशेला असलेल्या पादचारी पुलाखालीही अशाच प्रकारे आजही मासे विक्रेते बसतात. तसेच येथे वाहनेही पार्क केली जातात.