घोडबंदर मार्गालगत बेकायदा पार्किंग, विकासकामांमुळे वाहतुकीला अडथळे

ठाणे : घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी या उद्देशाने महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत या मार्गालगत उभारलेले सेवा रस्ते मलवाहिन्यांच्या कामासाठी जागोजागी खोदून ठेवल्याचे चित्र असून, ज्या ठिकाणी ही कामे नाहीत तेथे लगतच असलेल्या इमारतीमधील व्यावसायिक आस्थापनांमधील वाहनांचे अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने घोडबंदरमार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा वापर करतात. घोडबंदर भागात मोठय़ा प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची वाहनेही याच मार्गावरून वाहतूक करतात. त्यामुळे वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानला जाणारा हा मार्ग सतत वाहनांनी गजबजलेला असतो. या मार्गावरील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई हाती घेतली होती. या कारवाईनंतर गायमुखपर्यंत डांबरीकरण करून नवे कोरे सेवा रस्ते तयार करण्यात आले होते.

या सेवा रस्त्यांमुळे मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा भार काहीसा हलका होऊ लागला होता, तसेच स्थानिक रहिवाशांसाठी या मार्गावरून प्रवास करणे सोयीचे ठरत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे सेवा रस्ते म्हणजे बेकायदा वाहनतळ ठरू लागले आहेत. हे अतिक्रमण कमी होते म्हणून काय आता मलवाहिनीच्या कामासाठी महापालिकेने वाघबीळपासून गायमुखपर्यंत सेवा रस्ते जागोजागी मधोमध खोदले आहेत. या खोदकामातून निघालेली मातीचे ढीग तिथेच रचून ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी मलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे अशा ठिकाणी माती आणि खडी टाकून रस्ता बुजविण्यात आला असला तरी हे कामही अर्धवट आहेत. त्यामुळे येथून वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी बांधकाम विकास हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून महापालिकेने कापुरबावडी पोलीस ठाण्याची इमारत उभारली. याठिकाणचा सेवा रस्ता जागोजागी खोदण्यात आल्याने कासारवडवलीच्या या महत्त्वाच्या चौकात दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.

मंजुरी उशिरा मिळाल्याचा दावा

केंद्र शासनाने आखलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून घोडबंदर भागात मलवाहिन्यांच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून महापालिका प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. यापूर्वी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू विकास योजनेतून निधी मिळण्यासाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गेल्या चार वर्षांपासून या प्रस्तावासाठी पाठपुरावा सुरू असतानाही त्यास फारसे यश येत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सेवा रस्त्यांची कामे करण्यात आली होती. मात्र आता या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिल्याने मलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्य रस्त्याचीही दुरवस्था..

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन सिमेंट काँक्रीट, तर एक डांबराची मार्गिका आहे. या मार्गिकेशेजारीच आणखी एका मार्गिकेइतकी जागा शिल्लक आहे. मात्र या जागेवर डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे या जागेचा वापर वाहतुकीसाठी होत नाही. पावसाळ्यामध्ये याठिकाणी चिखल पसरलेला असतो. या जागेचा वापर सध्या बेकायदा ट्रक, खासगी बस आणि कार अशा वाहनांच्या पार्किंगसाठी होताना दिसून येतो.